◻️ जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, वाळू तस्कंराना महसूल मंत्र्यानी फटकारले
◻️ डेपो सुरु करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्यांना माफी नाही
◻️ उंबरी पुलाचे काम बंद ठेवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा
संगमनेर LIVE | सर्वसामान्य नागरीकांसाठी सुरु केलेल्या वाळू धोरणाच्या अंमलबजावणीत कोणी कितीही अडथळे आणले तरी, हे धोरण यशस्वी करण्यासाठी शासन समर्थ आहे. मात्र ज्या कार्यक्षेत्रात आता वाळू विक्री केंद्र यशस्वीपणे सुरु करण्यास आधिकारी हलगर्जीपणा दाखवित असतील तर त्यांनाच जबाबदार धरुन कारवाई करण्याचा इशारा महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रूक येथे वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी सिध्दराम सालिमठ, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, शाळीग्राम होडगर, मच्छिंद्र थेटे, अजय ब्राम्हणे, रोहीणी निघुते, कैलास तांबे, सतिष कानवडे, भगवानराव इलग, अशोक जऱ्हाड, रामभाऊ भुसाळ, प्रांताधिकारी शैलेंश हिंगे, तहसिलदार धिरज मांढरे, पोपट वाणी, गुलाबराव सांगळे, शिवाजीराव इलग, विलासशेठ उंबरकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, वाळूच्या पैशातून सुरु असलेले राजकारण आणि गुन्हेंगारीकरण थांबविण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. आत्तापर्यंत जेवढे वाळू विक्री केंद्र सुरु झाले आहे त्यामधून २० हजार ब्रास वाळू उपलब्ध केली आहे. यामधून राज्य सरकारच्या तिजोरीत ६०० रुपये दराने थेट रक्कम जमा झाली आहे. तरीही अद्याप या व्यवसायातील माफीयाराज संपत नाही. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असा उल्लेख करुन त्यांनी सांगितले की, सरकारी यंत्रणाच जर या वाळू धोरणात आता अडथळा आणत असेल तर गांभिर्याने पाऊल उचालावी लागतील असे त्यांनी स्पष्ट केली.
जलसंपदा विभागाने वाळू उचलण्यास कॅनॉलचे कारण सांगून परवानगी दिली नव्हती. मग यापुर्वी वाळू उपसा होताना कॅनॉलची आठवन झाली नाही का? असा थेट सवाल करुन, आमच्याही विभागातील काही आधिकारी डेपो सुरु करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. परंतू आता हलगर्जीपणा करणाऱ्यांना माफी नाही असा गर्भित इशारा देवून मंत्री विखे पाटील म्हणाले की, राज्य सरकार हे सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेत आहे. यापुर्वी महाविकास आघाडी सरकारकडून फक्त सामान्य माणसाची लुट आणि फसवणूक झाली. राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका सरकार घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
एकीकडे केवळ विरोधासाठी विरोध आणि कोणत्याही विषयाचे राजकारण करण्याची भूमिका महाविकास आघाडीकडून घेतली जात आहे. अडीच वर्षात यांचे एकतरी चांगले काम सांगा, विचारांशी प्रतारणा करुन, यांनी सत्ता मिळविली. सावरकरांचा अपमान होत असताना सुध्दा उध्दव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार नाहीत. आघाडीच्या नेत्यांकडे दुर्लक्ष करा, सरकार तुमच्यासाठी सकारात्मक भूमिका घेवून काम करीत असल्याचे ना. विखे पाटील म्हणाले.
निळवंडे कालव्यांचे श्रेय कोणाला द्यायचे त्यांनी जरुर घ्यावे, परंतू निमगाव जाळी येथून जाणाऱ्या कालव्याचे काम जाणीवपुर्वक कोणी रखडविले, उंबरीच्या पुलाचे काम बंद का ठेवले, संबधित ठेकेदारावर कारवाई करा आणि काळ्या यादीत टाका अशा स्पष्ट सुचना मंत्री विखे पाटील यांनी आधिकाऱ्यांना दिल्या. राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपण गुरुवारी पुण्यामध्ये खासगी आणि सहकारी दूध संघ चालकांची महत्वपूर्ण बैठक बोलावली असून, पशुखाद्य कंपन्यांनाही या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. दूध उत्पादकांवरील अन्याय सहन करणार नाही ही भूमिका घेवून सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणा उभे राहील अशी ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली.
दरम्यान याप्रसंगी शाळीग्राम होडगर यांचेही भाषण झाले. तसेच यावेळी आश्वी सह पंचक्रोशीतील पदाधिकारी, जेष्ठ व तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.