◻️ महसूल तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती
संगमनेर LIVE | शहरातील साईनगरकडे जाणाऱ्या म्हाळूंगी नदीवरील पुलाच्या कामास नगरविकास विभागाच्या माध्यमातून ४ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने मंजुर झाला असल्याची माहिती महसूल तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
मोठ्या स्वरुपात झालेला पाऊस आणि म्हाळुंगी नदीला आलेल्या पुरामुळे हा पुल मोठ्या प्रमाणात खचला होता. त्यामुळे नागरीकांची, विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण झाली होती. या संदर्भात स्थानिक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महसूल मंत्री ना. विखे पाटील यांची भेट घेवून या पुलाच्या कामास निधीची उपलब्धता करुन द्यावी अशी विनंती केली होती. मंत्री विखे पाटील यांनी नगरपरिषद तसेच सार्वजनिक बांधकाम विभागास याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना दिल्या होत्या.
सदर प्रस्तावानुसार या पुलाच्या कामास वैशिष्ट्यपुर्ण बाब म्हणून निधी उपलब्ध करुन द्यावा अशी विनंती मंत्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. पुलाच्या कामाचे गांभिर्य लक्षात घेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमारे ४ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजुर केला असल्याने नागरीकांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच संगमनेर नगरपरिषद हद्दीतील काही रस्त्यांच्या कामांना तसेच सुशोभिकरण आणि रस्त्यांच्या कामासाठी राज्य सरकारने निधी मंजुर केला आहे.
पुलाच्या कामाबाबत महसूल मंत्री विखे पाटील यांनी व्यक्तिश: पाठुपरावा करुन निधीची मंजुरी मिळवून दिल्याबद्दल स्थानिक भाजप कार्यकर्त्यानी त्यांचे आभार मानले आहेत.