◻️ त्यांना दुष्काळी भागाचा आनंद बघवत नाही
◻️ उद्घाटनाच्या हौसेपायी पाण्याची उशिरा चाचणी
◻️ अकोले तालुक्यातील शेतकरी समजूतदार, चर्चेने मार्ग काढता आला असता
संगमनेर LIVE | अनेक दिवसांच्या परिश्रमातून कालव्यांची कामे पूर्ण झाली आहेत. निवळ उद्घाटनाच्या हौसेपायी पाण्याची उशिरा चाचणी करावी लागली. कालव्यांमधून पाणी सुटले आणि दुष्काळी भागातील जनतेमध्ये मोठा आनंद निर्माण झाला. कालव्यांच्या शेजारी जमिनी असलेल्या अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांच्या काही अडचणी असतील तर त्यांची समजूत काढून, उपाययोजना करून हे पाणी सुरू ठेवता आले असते. मात्र असे काहीही न करता घाईघाईने कालव्यांमधील पाणी बंद करण्याचे कारण काय? असा सवाल माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
निळवंडे कालव्यांमधील पाणी बंद केल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करताना काँग्रेस नेते आमदार थोरात म्हणाले की, निळवंडे धरण व कालव्यांची कामे अनेक दिवसांच्या पाठपुराव्यातून व परिश्रमातून पूर्ण झाली आहे. ही कामे कोणी केली हे दुष्काळी भागातील सर्व नागरिकांसह जिल्ह्यातील व राज्यातील सर्व जनतेला माहित आहे. पंतप्रधानांच्या हस्तेच निळवंडे कालव्यांचे उद्घाटन करायचे या हट्टा पायी उशिरा पाणी सुटले, मात्र तरीही पाणी सुटल्याने दुष्काळी भागातील जनतेमध्ये मोठा आनंद निर्माण झाला. गावोगावी शेतकरी, महिला नागरिक यांनी मोठ्या आनंदाने या पाण्याचे स्वागत केले. हे दुष्काळी भागातील जनतेच्या आनंदाचे दिवस आहे.
१० हजार एमटीएफसी पाणी शिल्लक असताना चाचणीसाठी फक्त २०० एमटीएफसी पाणी वापरण्यात आले. अजून मोठ्या प्रमाणात धरणांमध्ये पाणी शिल्लक आहे. सोडलेले पाणी कालव्यांमधून सुरू ठेवले असते तर आजूबाजूंच्या विहिरींमध्ये पाणी उतरले असते. शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद वाढला असता. नागरिकांनी आनंद घेतला असता. मात्र हा आनंद कुणाला तरी पाहावत नाही. म्हणून अत्यंत घाईघाईने पाणी बंद करण्याचा चुकीचा निर्णय घेतला आहे.
शास्त्रज्ञांनी, अभ्यासकांनी अलनिनोचे संकट वर्तविलेले आहे. प्रशासकीय स्तरावरून खबरदारी म्हणून त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिलेल्या आहे. अशा परिस्थितीत धरणामध्ये शिल्लक असलेले दहा टीएमसी पाणी दुष्काळी भागात आले तर त्यांच्या आयुष्याचे सोने होईल. मात्र काही मंडळींना प्रश्न सोडवण्याची इच्छाच दिसत नाही,
अकोले तालुक्यातील नेतृत्व आणि शेतकरी बांधवांच्या सहकार्यातूनच निळवंडे धरण आणि कालवे पूर्ण झाले. त्यांनी आजवर कायम सहकार्याची भावना ठेवलेली आहे. आजही त्यांच्याबरोबर चर्चा करून मार्ग काढता आला असता, मात्र असे काहीही न करता थेट पाणी बंद करणे हे दुष्काळी भागासाठी दृष्टचक्र असेल. आपल्याला दुष्काळी भागातील जनतेचा आनंद का बघवत नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.