◻️ सिंहाचा छावा सदैव आपल्या सोबत - विवेक कोल्हे
◻️ स्वतःचा कारखाना नीट चालवता येत नाही ते गणेश चांगला कसा चालवणार
◻️ सभेसाठी परवानगी नाकारली मात्र, जनता उत्स्फूर्तपणे परिवर्तनाच्या लाटेत सहभागी
संगमनेर LIVE (राहाता) | ज्यांना स्वतःचा कारखाना नीट चालवता येत नाही ते गणेश चांगला कसा चालवणार. त्यांची दडपशाही झुगारून सभासद व जनतेचा मोठा पाठिंबा या निवडणुकीत मिळवला असून ही निवडणूक गणेश परिसरातील शेतकऱ्यांची अस्मिता व स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आहे. आमचा हेतू हा स्वच्छ व प्रामाणिक असून शेतकरी व कामगारांच्या विकासासाठी कटिबद्ध असून या परिसरातील हुकूमशाही हटवण्यासाठी परिवर्तन आवश्यक असल्याचे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे तर स्वर्गीय शंकररावजी कोल्हे यांचा छावा सदैव तुमच्या सोबत असेल असे युवा नेते विवेक कोल्हे यांनी म्हटले आहे.
राहता येथे श्री गणेश परिवर्तन पॅनलच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे चेअरमन विवेक भैय्या कोल्हे, रामचंद्र बोठे, सचिन गुजर, करण ससाने, डॉ. एकनाथ गोंदकर, सुधीर मस्के, सौ. प्रभावतीताई घोगरे, सुरेश थोरात, अविनाश दंडवते, मा. चेअरमन ॲड. नारायणराव कार्ले, शिवाजीराव लहाने आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, संगमनेर आणि संजीवनी हे कारखाने आदर्शवत आहेत. गणेश कारखान्याने वैभवाचे दिवस पाहिले. मात्र त्यांच्या हातात सत्ता गेल्याने या कारखान्याची प्रगती थांबली आहे. ज्यांना स्वतःचा कारखाना नीट चालवता येत नाही ते गणेश काय चालवणार.
निळवंडे साठी आपण कष्ट केले पाणी सोडल्यानंतर शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला होता. परंतु शेतकरी मोठ्या आनंदाने पाणी पूजन करतात हे त्यांना पाहवत नसल्याने घाईघाईने पाणी बंद केले. या परिसरात मोठे दबावाचे व भीतीचे वातावरण असून त्यांच्या दहशतीचे झाकण जनतेने उडून दिले आहे. सभेसाठी परवानगी नाकारली मात्र जनता उत्स्फूर्तपणे परिवर्तनाच्या लाटेत सहभागी झाली असून अत्यंत मोठ्या संख्येने आज सभासद उपस्थित झाले आहेत. स्वातंत्र्य व अस्मिता टिकवण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून गणेश परिसरातील नागरिकांच्या विकासाचा प्रामाणिक हेतू आमचा आहे. त्यांचा हेतू चांगला नव्हता म्हणून गणेश चालला नाही असा टोलाही आमदार थोरात यांनी विखे यांना लगावला आहे.
विवेक कोल्हे म्हणाले की, अमृत आणि संजीवनी एकत्र येऊन गणेश चालवणार आहेत. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांचा समृद्ध वारसा आपण जपला असून सिंह आपल्यात नाही .परंतु त्यांचा छावा सदैव आपल्या सोबत आहे. शेतकऱ्यांच्या विकासासाठी आपण कायम कटिबद्ध असून गणेश परिसरातील जनतेला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही असे सांगितले.
सौ. प्रभावतीताई घोगरे म्हणाल्या की, राहाता तालुक्यात विखे घराण्याची मोठी दडपशाही व हुकूमशाही आहे. या हुकूमशाहीला घाबरू नका. शेजार धर्म काय असतो ते आम्हाला विचारा, ते परिसरात कोणालाही मोठे होऊ देत नाही अगदी पान टपरीच्या उद्घाटनालाही त्यांनाच बोलवावे या दडपशाविरुद्ध एकत्र येत सर्वानी आमदार थोरात व विवेक कोल्हे यांच्या पाठीशी उभे राहताना सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही जमीनदोस्त करा असे आवाहन केले
यावेळी डॉ. एकनाथ गोंदकर, सुहासराव वहाडणे, करण ससाने आदींसह विविध पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली..
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजीराव लहारे यांनी केले. यावेळी लताताई डांगे, अरुण कडू, बाळासाहेब विखे, सचिन कोते, रावसाहेब बोठे, धनंजय गाडेकर, समीर करमासे, शितल लहारे, आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.