◻️ हिंदु, मुस्लिम किंवा दलित सर्वच समाजावर सत्ताधाऱ्यांकडून कायद्याचा गैरवापर
◻️ दलित बांधवांनी काढलेल्या निळ्या मोर्चातील १०० ते १२५ मोर्चेकऱ्यावर गुन्हा दाखल
◻️ उध्दव ठाकरेंची शिवसेना दलित संघटनांच्या पाठीशी
संगमनेर LIVE | लोकशाहीत विविध समस्यांवर आणि न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन मोर्चे याद्वारे कायदेशीर मार्गाने आपल्या मागण्या मांडण्याची मुभा असते. त्या अनुषंगाने विविध संघटना मोर्चे किंवा आंदोलन करत असतात.
संगमनेर शहर व तालुक्यातील सर्व दलित संघटनांच्या वतीने दिनांक ८ जुलै रोजी निळ्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. सदर मोर्चामध्ये सर्व आंबेडकरवादी संघटना एकत्रित होऊन नांदेड येथील अक्षय भालेराव व मुंबई येथील हिना मेश्राम यांच्या हत्येच्या निषेधार्थ दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सदर मोर्चाचे आयोजन केलं होतं.
त्या मोर्चामध्ये सर्व दलित समाज बांधव सामील झाले व संगमनेर मध्ये मोठ्या संख्येने दलित बांधवांनी निळे वादळ तयार केले. दलित समाजातील नेतेमंडळी व कार्यकर्ते युवकांनी सदर मोर्चा अतिशय शांततेत काढला व शांततेच्या मार्गाने निषेध व्यक्त करत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून सदरील मोर्चाची सांगता झाली.
या गोष्टीचा काही राजकीय लोकांना राग आला व त्यांनी सत्तेचा गैरवापर करत शंभर ते सव्वाशे दलित बांधवांवर व नेत्यांवर गुन्हे दाखल केले. त्यामुळे या घटनेचा संगमनेर शहर व तालुका शिवसेना (ठाकरे) अमर कतारी तसेच तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे यांच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला असून दलित समाजाच्या पाठीशी उभे असल्याचे शहरप्रमुख अमर कतारी यांनी सांगितले.
अशाच प्रकारे संगमनेर मध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या भगवा मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं त्या मोर्चात सहभागी झालेल्या काही हिंदू बांधवावर देखील काही दिवसानंतर गुन्हे दाखल करण्यात आले, सदर गुन्हे सूड बुद्धीने राजकीय हेतुपूरस्सर असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
संगमनेर येथे शिंदे गटाच्या सत्ताधारी कार्यकर्त्यानी खासदार संजय राऊत यांच्या फोटोला काळे फासले व कोणतीही पूर्व परवानगी न घेता आंदोलन केले होते. त्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आक्षेप घेत सदर आंदोलन कर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची लेखी मागणी करून देखील सदर आंदोलकांवर अजूनही गुन्हे दाखल झालेले नाही. भाजपच्या काळात एकाला एक न्याय व दुसऱ्याला एक न्याय हे धोरण चुकीचे आहे.
तसेच दलित बांधवांवर केलेल्या अन्यायाचा शिवसेनेच्या वतीने निषेध व्यक्त करत चुकीच्या पद्धतीने आंदोलन करणाऱ्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यावर त्वरित गुन्हे दाखल करावे. असे आवाहन शहरप्रमुख अमर कतारी यांनी केले आहे.