◻️ गावापासून अतंरावर वाडी असल्याने करावे लागतात उघड्यावरचं अंत्यसंस्कार
संगमनेर LIVE | शिर्डी विधानसभा मतदार संघ व संगमनेर तालुक्यातील अतिशय महत्वाच्या अशा शिबलापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या माळेवाडी येथे स्मशानभूमी नसल्याने नागरिकांना अंत्यसंस्कार उघड्यावर करण्याची वेळ आल्याने याठिकाणी स्मशानभूमीची व्यवस्था करुन द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
याबाबत स्थानिक नागरिकांनी दिलेली माहिती अशी की, माळेवाडीचा परिसर हा शिबलापूर ग्रामपंचायत अंतर्गत येता. गावाप्रमाणेचं माळेवाडी शिवारात देखिल विविध जाती धर्माची मोठी लोकवस्ती असून लहान - मोठे १ ते दीड हजार लोकसंख्या या ठिकाणी राहत असल्याने दोन ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणाहून निवडूण जातात. गावापासून माळेवाडीचे अंतर हे जास्त आहे.
त्यामुळे येथील एखादी व्यक्ती मयत झाल्यास त्या व्यक्तीचा मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी शिबलापूर येथे असलेल्या स्मशानभूमीपर्यत घेऊन जाणे अत्यंत जिकिरीचे होत असल्याने स्थानिक नागरीकाबरोबरचं या दुःखद प्रसंगात सहभागी होण्यासाठी आलेल्या नातेवाईक, मित्रपरिवार व पंचक्रोशीतील ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असतो. यामुळे मयत व्यक्तीवर उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. त्यामुळे माळेवाडी येथे असलेली अतिक्रमणे काढून त्याठिकाणी स्मशानभूमीची व्यवस्था करुन नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दरम्यान स्थानिक नागरिकांनी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांची भेट घेऊन याबाबत माहिती दिल्याने खासदार लोखंडे यांनी प्रशासनाला त्या ठिकाणावरील अतिक्रमण काढून स्मशानभूमीची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर ग्रामस्थांनी शिबलापूर ग्रामपंचायतचे सरपंच व प्रशासनाला याबाबत सविस्तर निवेदन दिल्याने नागरीकांची समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीकडून काय पावले उचलली जातात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
माळेवाडी ने आतापर्यत शिबलापूर ग्रामपंचायतीला सात सरपंच व तीन उप सरपंच दिले आहेत. तर सेवा सोसायटीचे चेअरमन, संचालक तसेच मोठं मोठ्या पदावर काम करण्यासाठी पदाधिकारी दिले. मात्र या पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक माळेवाडी येथिल स्मशानभूमसह विविध समस्या जैसे-थे ठेवल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे आतातरी स्मशानभूमीची समस्या सोडविण्यासाठी हे सर्व पदाधिकारी पक्ष, गट - तट विसरून एकत्र येऊन प्रयत्न करतील का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.