◻️ शेतकऱ्याचे अंदाजे १ लाखाचे नुकसान
◻️ सश्रु नयनांनी गायीला निरोप
संगमनेर LIVE | राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक गावातील सुर्यभान तात्याबा तांबे या शेतकऱ्याची गाभण गाय विषारी नाग चावल्याने मृत्युमुखी पडली आहे. गायीच्या मृत्यूमुळे हवालदिल झालेल्या या शेतकरी कुटुंबाने या गायीवर अंत्यसंस्कार केले आहे. तर या गायीच्या मृत्यूमुळे अंदाजे १ लाख रुपये नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, दाढ बुद्रूक शिवारात रविवारी सायंकाळी ६.३० विजेच्या सुमारास सुर्यभान तात्याबा तांबे यांच्या गोठ्यातील गाय अस्वस्थ वाटत असताना गायीच्या तोंडातून फेस येऊन गाय खाली कोसळली. त्यामुळे तांबे कुटुंबातील असलेले दीपक सुर्यभान तांबे यांनी तात्काळ खाजगी डॉ. निमसे व सुभाष गाडेकर यांना घडलेल्या घटनेची माहिती देऊन तात्काळ औषधोपचार करण्यास बोलावले मात्र उपचारादरम्यान या गायीचा मृत्यू झाला आहे.
यावेळी गोठ्यातील एका ठिकाणी बीळ दिसल्याने तांबे यानी जवळ जाऊन पाहिले असता त्यामध्ये साप असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे त्यांनी सर्पमित्र शिवा पवार यांना माहिती देऊन घटनास्थळी येण्यास सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखून सर्पमित्र शिवा पवार याने घटनास्थळी जाऊन मोठ्या शिताफीने या नागाला बिळातून बाहेर काढत उपस्थिताना दहशतीतून मुक्त केले. तर हा भारतीय जातीचा अतिविषारी कोब्रा नाग असल्याची माहिती देऊन मृत गायीच्या लक्षणांवरून हा विषारी नाग चावल्यामुळे गायीचा मृत्यू झाला असल्याची शक्यता बोलुन दाखवली.
कित्येक वर्षांपासून या गायीचा सांभाळ तांबे कुटुंब करत होते. या गायीच्या मृत्यूमुळे सर्व तांबे कुटुंबीयांनी डोळ्यातून निघणाऱ्या अश्रूंच्या धारानी लाडक्या गायीला अखेरचा निरोप दिला असून तांबे कुटुंबाला शासनाने भरपाई द्यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
दरम्यान या दुर्दैवी घटनेची माहिती मिळाल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डांगे यांनी तांबे कुटुंबाची भेट घेऊन शेतकऱ्यांचे कोणतेही आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी शासनाकडे भरपाई मिळावी यासाठी प्रस्ताव पाठवणार असल्याची माहिती दिली आहे.