◻️ शिक्षणांसोबत नोकरीही हाच उद्देश - ना. विखे पाटील
संगमनेर LIVE (लोणी) | लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय लोणी यांना “इंडियन अचिव्हर्स अवॉर्ड २०२३” या अवार्ड अंतर्गत या वर्षीचा अनेक विद्यार्थ्यांना नोकरी दिल्याबद्दल “प्लेसमेंट एक्सलन्स अवॉर्ड" मुंबई येथे प्रदान करण्यात आल्याची माहिती प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी दिली.
ग्रामीण भागातील शेतकरी आणि सामान्य जनतेला तांत्रिक शिक्षण मिळावे म्हणून पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी ग्रामीण भागात हे महाविद्यालय सुरू केले. राज्यासह देशात आणि परदेशातदेखील या महाविद्यालयाचे विद्यार्थी कार्यरत आहेत. निसर्गरम्य, पर्यावरणपुरक आणि शहरी भागात मिळणाऱ्या सर्व सुविधा संस्थेचे अध्यक्ष राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपलब्ध करून दिल्यानेच हा पुरस्कार मिळाला असल्याचे प्राचार्य डॉ. संजय गल्हाणे यांनी सांगितले.
यावेळी लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय लोणी येथील प्लेसमेंटमधील कामगिरी उल्लेखनीय तसेच सातत्याने उंचवणारी आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये ३४० हून अधिक विद्यार्थांना तर चालू शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये परीक्षा सुरू होण्या आधीच ३०० हून अधिक विद्यार्थाना महाविद्यालयाच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. आण्णासाहेब वराडे व त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली नोकरी मिळाली आहे.
पॉवर कॉरिडॉर तर्फे इंडियन अचिव्हर्स अवॉर्ड हा आरोग्यसेवा, शिक्षण, उद्योजकता, सामाजिक सक्रियता आणि एकता यांसारख्या विविध क्षेत्रांत राष्ट्रसेवेसाठी पुढे येणाऱ्या नागरिकांच्या प्रयत्नांची आणि समर्पणाची नोंद घेऊन त्या करिता उत्तेजन आणि प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून देण्यात येणारा एक प्रतिष्ठित भारतीय राष्ट्रीय पुरस्कार आहे. या पुरस्कारांचे आयोजन पॉवर कॉरिडॉरद्वारे केले जाते. हे पुरस्कार दरवर्षी आयोजित केले जातात आणि केंद्रीय आरोग्य मंत्री, केंद्रीय शिक्षण मंत्री, केंद्रीय संरक्षण मंत्री किंवा पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळातील कोणत्याही केंद्रीय मंत्री यांसारख्या आघाडीच्या राजकीय व्यक्तीद्वारे प्रदान केले जातात.
पॉवर कॉरिडॉर यांच्या वतीने देश पातळीवर अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांकरीता उपलब्ध असलेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि प्लेसमेंट सुविधांचे सर्व्हेक्षण करण्यात आले होते. यासाठी ठरवून देण्यात आलेल्या सर्व निकषांत प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयाची प्लेसमेंट कामगिरी सर्वोत्कृष्ट ठरल्याने महाविद्यालयाचा गौरव देशपातळीवर झाला आहे.
दरम्यान पुरस्काराचे वितरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय डॉ. शिवानंद हिरेमठ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाणे, प्लेसमेंट विभागाचे प्रमुख डॉ. अण्णासाहेब वराडे यांनी स्वीकारला आहे.
“प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयात गुणवतापूर्ण शिक्षणाबरोबरच प्लेसमेंटच्या माध्यमातून नोकरीची संधी मिळवून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले जातात. यामुळेच देशातील नामांकित कंपन्यांमध्ये आमचे विद्यार्थी चांगल्या पदावर पोहचले आहेत. आज महाविद्यालयाचा राज्य पातळीवर झालेला गौरव हे सर्वांच्या सांघिक प्रयत्नाचे यश आहे, असे संस्थेचे चेअरमन तथा महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.