संगमनेर LIVE | लोकशाहीमध्ये मतदान हे अत्यंत महत्त्वाचे असून तो मूलभूत हक्क आहे. नव्याने अठरा वर्षे पूर्ण केलेल्या युवकांना सहजासहजी मतदार नोंदणी करता यावी यासाठी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्ताने कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून मिस कॉल द्या व मतदार नोंदणी करून घ्या या नवीन मतदार नोंदणी अभियानाच्या शुभारंभ काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार थोरात यांच्या हस्ते झाला.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर नवीन मतदार नोंदणी अभियानचा शुभारंभ झाला. यावेळी माजी प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, बाजीराव खेमनर, शंकरराव खेमनर, मिलिंद कानवडे, सोमेश्वर दिवटे, रामहरी कातोरे, निखिल पापडेजा, सुरेश झावरे, संतोष हासे, आर. बी. राहणे यांचे सह संगमनेर तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे व अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी व तालुक्यातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून या तालुक्यातील युवकांना आपल्या मतदार नोंदणीसाठी ८०५५९८७७७७ या नंबर वर मिस कॉल दिल्यानंतर त्या व्यक्तीला एक टॅक्स मेसेज प्राप्त होईल. त्यातील फॉर्मवर लिंक असेल त्या लिंक वर युवकांनी आपली प्राथमिक माहिती भरायची आहे व ऑनलाइन सबमिट करायची आहे.
यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला राज्यघटना दिली. देशाच्या लोकशाही मध्ये मतदान हे अत्यंत महत्त्वाचे असून प्रत्येक मताला खूप मोठे महत्त्व आहे. अठरा वर्षे पूर्ण केलेल्या युवकांना सहजासहजी मतदार नोंदणी करता यावी यासाठी ही ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. तरुण हे देशाचे भवितव्य असून त्यांना योग्य दिशा व मार्गदर्शन केले तर ते नक्कीच मोठे काम करतात. सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, इंदिरा गांधी, पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा मोठा वारसा असणाऱ्या महिलांचा देशात पन्नास टक्के वाटा असून ज्या ज्या ठिकाणी संधी मिळाली आहे. त्या - त्या ठिकाणी महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे.
युवकांनी राजकारण व समाजकारण यामध्ये येत समाजासाठी काम केले पाहिजे आगामी काळ हा काँग्रेस पक्षाचा असून युवकांना मोठी संधी असल्याचेही ते म्हणाले.
मा. आ. डॉ तांबे म्हणाले की भारतरत्न राजीव गांधी यांनी तरुणांना वयाच्या अठराव्या वर्षी मतदान करण्याचा हक्क दिला. युवक हे देशाचे सामर्थ्य असून या युवाशक्तीचा उपयोग हा देशाच्या विकासासाठी होने करता त्यांना चांगली दिशा दिली गेली पाहिजे असे ही ते म्हणाले.
डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, पुढील पन्नास वर्षे हे तरुणांचे आहेत. तरुणांना संधी दिली तर ते नक्कीच संधीचे सोने करत असतात. विविध क्षेत्रात संगमनेर तालुक्यातील युवकांनी केलेले कार्य हे कौतुकास्पद असून युवकांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला आहे. माझे पहिले मत संगमनेरच्या विकासासाठी ही संकल्पना राबवताना नव तरुणांसाठी साध्या पद्धतीने ८०५५९८७७७७ या क्रमांकावर मिस कॉल दिल्यास आलेल्या लिंक वर आपली माहिती भरून द्यायची आहे. यानंतर संबंधित तरुणाकडे जनसेवक जाऊन जन्म दाखला, पॅन कार्ड, आधार कार्ड यापैकी एक आणि रहिवासी पुरावा कोणताही असे कागदपत्रे घेऊन ते शासकीय विभागात जमा करतील म्हणजे नवीन युवकांना सहजासहजी नाव नोंदणीस मदत होईल असेही त्या म्हणाल्या.
यावेळी संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील व संगमनेर शहरातील अनेक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
८०५५९८७७७७ वर मिस कॉल द्या
८०५५९८७७७७ या दूरध्वनी क्रमांकावर नवीन मतदार नोंदणी करण्यासाठी मिस कॉल द्यावा. यानंतर त्यांना एक लिंक येईल. त्या लिंक वर आपली प्राथमिक माहिती भरून प्रत्येकाने सबमिट करावी. या नंबर वर प्रथम मतदान करणाऱ्या जास्तीत जास्त युवक व युवतींनी मिस कॉल देऊन आपली मतदान नोंदणी करावी असे आवाहन ही डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले आहे.