◻️ दंडकारण्य अभियानांतर्गत वृक्षारोपण
संगमनेर LIVE | पर्यावरण संवर्धनाची सर्वात मोठी लोक चळवळ असलेल्या दंडकारण्य अभियानातून राजहंस दूध संघाने हिवरगाव पावसा येथील देवगड परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व संवर्धन केले असल्याने हा परिसर हिरवाईने फुलला असल्याचे प्रतिपादन सौ. दुर्गाताई तांबे यांनी केले आहे. तर हिरवाई हीच खरी समृद्धी असल्याचे रणजीत सिंह देशमुख यांनी म्हटले आहे.
हिवरगाव पावसा येथील देवगड डोंगर परिसरात संगमनेर तालूका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रीया संघाचे वतीने दंडकारण्य अभियानांतर्गत लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी प्रकल्प प्रमुख सौ. दुर्गाताई तांबे, दुध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, व्हा. चेअरमन राजेंद्र चकोर, संचालक विलासराव वर्पे, भास्करराव सिनारे, विलासराव कवडे, संतोष मांडेकर, विक्रमराजे थोरात, रविंद्र रोहम, बबनराव कुराडे, डॉ. प्रमोद पावसे, सौ. प्रतिभाताई जोधंळे, सौ. सुषमाताई भालेराव, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी, गणपतराव शिंदे, देवगड देवस्थानचे अध्यक्ष उत्तमराव जाधव, उपाध्यक्ष यादवराव पावसे, गणपत हासे, गोरक्षनाथ पावसे, बबन शिंदे, मोठ्याभाऊ बढे, चंद्रशेखर गडाख, पांडूरंग गडाख, संदिप पावसे, अशोक पावसे, अभियानाचे सावंत, फापाळे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले हे दंडकारण्य अभियान राज्याला दिशादर्शक ठरले आहे. आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात वृक्ष संवर्धन संस्कृती वाढली असून दूध संघाने मागील चार वर्षात देवगड परिसरात केलेल्या वृक्षरोपण व संवर्धनामुळे हा परिसर हिरवाईने फुलला आहे. देवगड हे तालुक्याचे मोठे आध्यात्मिक क्षेत्र असून अध्यात्म आणि पर्यावरण असा हा दुहेरी संगम या परिसराला लाभला असल्याने तालुक्यातील नागरिकांची मोठी गर्दी ठिकाणी वाढणार आहे.
रणजितसिंह देशमुख म्हणाले की, दूध संघाने संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनात मोठी आर्थिक समृद्धी निर्माण केली असून आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला आहे. कोरोनाच्या संकटानंतर प्रत्येकाला पर्यावरणाचे महत्व पटू लागले असून वृक्ष व हिरवाई हीच खरी आपली समृद्धी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी विविध पर्यावरण गीते सादर केली.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक डॉक्टर सुजित खिलारी यांनी केले तर प्रमोद पावसे यांनी आभार मानले.