◻️ काँग्रेस पक्षाचे निरीक्षक चंद्रकांत हंडोरे यांच्या वक्तव्यावर संगमनेर येथील शिवसैनिक नाराज
◻️ शिर्डी येथे शिवसेनेचाच उमेदवार विजयी होईल
◻️ आघाडी म्हणायची व बिघाडी करायची खोड कोणी करू नये
◻️ २०२४ च्या निवडणुकीनंतर खा. लोखंडे यांचे गाठोडे मुंबईला पाठवणार
संगमनेर LIVE | शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा गेल्या तीन ते चार पंचवार्षिक पासून सातत्याने शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून शिवसेनेच्याच उमेदवाराला विजय करत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शेतकरी, कामगार, सामान्य नागरिक अश्या सर्वांना सोबत घेऊन शिवसेना ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण करत असते राज्यात झालेल्या चुकीच्या गोष्टीमुळे जनता संतप्त असून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्याच घरावर भाजपाने केलेली कुरघोडीला उत्तर देण्यासाठी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत उद्धवसाहेबांच्या पाठीशी उभे राहून नागरिक मतदान करणार असल्याचे शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) शहर प्रमुख अमर कतारी यांनी म्हटले आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात अमर कतारी यांनी म्हटले आहे की, शिवसेनेच्या वाईट काळात काँग्रेस व राष्ट्रवादी मित्र पक्षांनी महाविकास आघाडी करत साथ दिली. त्यामुळे ही आघाडी पुन्हा एकदा सत्तेवर येईल. मात्र आघाडी म्हणायची व बिघाडी करायची खोड कोणी करणार असेल तर केवळ ठाकरे ब्रँडवर देखिल अधिक जागा जिंकण्याची ताकद ठाकरेंच्या शिवसैनिकांकडे आहे.
काँग्रेस पक्षाच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील आढावा बैठकीत पक्षाचे निरीक्षक चंद्रकांत हंडोरे यांनी शिवसेनेच्या १८ पैकी गद्दार झालेल्या खासदारांबाबत वक्तव्य करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची एक प्रकारे खिल्ली उडवत आघाडीत बिघाडी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यांना माझे एवढेच सांगणे आहे की, काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ व संयमी नेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रामाणिक नेतृत्वावर आम्हाला विश्वास असून उद्धव साहेब व सामान्य शिवसैनिकांना कुठलाही त्रास होईल असा कोणताही निर्णय ते घेणार नाहीत.
पक्षाने जबाबदारी दिली म्हणून काहीही बरळत राहिल्यास आगामी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषदा, नगरपालिका निवडणुकीत एकत्रपणे कसे लढायचे व भाजपाच्या हुकूमशाही विरोधात कसे उभे राहायचे? तेव्हा महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला कोणताही धोका होईल असे वक्तव्य कोणी करू नये. याउलट एकदिलाने उभे राहून शिर्डी लोकसभा मतदार संघातून उद्धवसाहेबांचे हात बळकट करणारा उमेदवार निवडून देण्यासाठीच प्रयत्न करावे ही आम्हा शिवसैनिकांची ईच्छा आहे.
याही आधी या मतदार संघात भाजपचे सहयोगी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा पराभव केलेला असून गद्दारी करणाऱ्या भाऊसाहेब वाकचौरे यांना शिवप्रसाद देऊन शिवसेना काय असते ते दाखवून दिले आहे. खासदार सदाशिव लोखंडे यांना देखिल केलेली गद्दारी देखील मतदारांच्या पचनी पडली नसून २०२४ च्या निवडणुकीनंतर त्यांना देखील गाठोडे बांधून मुंबई गाठावी लागेल याचा निर्धार शिवसैनिकांनी केला असल्याचे अमर कतारी व तालूकाप्रमुख भाऊसाहेब हासे यांनी सांगितले आहे.