गणेश कारखाना बंद पाडणाऱ्यानी आम्‍हाला येथे येवून तत्‍वज्ञान सांगण्‍याची आवश्‍यकता नाही

संगमनेर Live
0
◻️ना. विखे पाटील यांनी घेतला गणेश कारखान्यावरुन विरोधकांचा समाचार 

◻️८ वर्षे जे ऊस घेवून जात होते त्‍यानी आता ऊस नेवू नये हे वक्‍तव्‍य आश्‍चर्यकारक

◻️ऊस कोणाला द्यायचा याचा निर्णय शेतकरी व सभासदाचा ; बाहेरच्‍यांनी येवून आम्‍हाला सल्‍ले देवू नये

संगमनेर LIVE (राहाता) | गणेश कारखाना बंद पाडून ज्‍यांनी वैभव घालविले ते आता पुन्‍हा गणेशला वैभव प्राप्‍त करुन देण्‍याची करीत असलेली भाषा त्‍यांना शोभत नाही, ८ वर्षे ऊस घेवून जात होते, त्‍यांनी आम्‍हाला येथे येवून तत्‍वज्ञान सांगण्‍याची आवश्‍यकता नाही. ऊस कोणाला द्यायचा याचा सर्वस्‍वी  निर्णय शेतकरी सभासद करतील. मलाही कार्यकर्त्‍यांच्‍या पाठीशी उभेच राहावे लागेल असे स्‍पष्‍ट प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.

शासन आपल्‍या दारी उपक्रमात डॉ. धनंजय धनवटे, सदाशिव धनवटे, बाबुराव लोंढे, डॉ. संपत शेळके, बाळासाहेब गाडेकर आदिंनी गणेश कारखान्‍याच्‍या संदर्भात उपस्थित केलेल्‍या प्रश्‍नावर मंत्री विखे पाटील यांनी भाष्‍य करुन ऊस उत्‍पादक शेतकऱ्यांना आश्‍वासित केले.  

ऊसाच्‍या नोंदी करुन घेण्‍याची विनंती करीत याबाबतचा ठरावही कार्यकर्त्‍यांनी उत्‍फुर्तपणे मांडला. त्‍याला अनुसरून मंत्री विखे पाटील यांनी आपल्‍या भाषणात गणेश कारखान्‍याच्‍या संदर्भात भाष्‍य केले. याप्रसंगी माजी चेअरमन मुकूंदराव सदाफळ, अॅड. रघुनाथ बोठे, बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्‍वर गोंदकर, माजी नगराध्‍यक्ष कैलास कोते, अभय शेळके, नितीन कापसे, प्रकाश चित्‍ते, डॉ. धनजंय धनवटे, सतिष बावके, अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी कोळेकर, प्रांताधिकारी माणिकराव आहेर, तहसिलदार अमोल मोरे यांच्‍यासह तालुक्‍यातील नागरीक मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

आपल्‍या भाषणात मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, मागील काही दिवसांपासून आपण अनेकांचे वक्‍तव्‍य ऐक‍त आहोत. गणेश कारखान्‍याला वैभव प्राप्‍त करुन देणार असे भाष्‍य करणाऱ्यांनीच गणेशची काय अवस्‍था करुन ठेवली होती हे सभासदांनी पाहीले आहे. २७ महिने कामगारांचे पगार नव्‍हते, शेतकऱ्यांचे पैसे थकले होते, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्‍याने आर्थिक भार सोसून हा कारखाना चालू केला. शेतकरी आणि कामगारांचे हित जोपासले. गणेश कारखाना आज कर्जमुक्‍त करुन तुमच्‍या ताब्‍यात दिला आहे. डॉ. विखे पाटील कारखान्‍याचे ३० ते ३५ कोटी रुपये घेणे आहे. ८ वर्षे जे ऊस घेवून जात होते त्‍यानी आता ऊस नेवू नये असे केलेले वक्‍तव्‍य आश्‍चर्यकारक वाटते असा टोलाही त्‍यांनी लगावला.

गणेश कारखान्‍याला तुम्‍ही आता कोणते वैभव प्राप्‍त करुन देणार, हे वैभव तुम्‍हीच घालविले होते. तुम्‍हाला तुमचे कार्यकर्ते सांभाळायचे होते म्‍हणून ऊस नेला. आता मी सुध्‍दा बघ्‍याची भूमिका घेणार नाही, कार्यकर्त्‍यांच्‍या पाठीशी मलाही खंबीरपणे उभे राहावेच लागेल असे स्‍पष्‍ट करत मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, ऊस कोणाला द्यायचा याचा निर्णय शेतकरी सभासद करतील. याबाबत बाहेरच्‍यांनी येवून आम्‍हाला सल्‍ले देवू नयेत. कार्यकर्त्‍यांनी आता गावपातळीवर संघटना एकीसाठी प्रयत्‍न करावेत आपआपसातील मतभेद दुर करुन आगामी निवडणूकांच्‍या दृष्‍टीने काम करावे.

मतदार संघात आपले काम वेगाने सुरु आहे. शासकीय योजनांच्‍या  अंमलबजावणी बाबत कार्यकर्त्‍यांन समन्‍वय ठेवून या योजनांकरीता लोकांमध्‍ये जावून काम केले पाहीजे. अडीच वर्षात कोणताही निर्णय झाला नव्‍हता. जिल्‍ह्याला तीन मंत्री होते पण कोणताही फायदा जिल्‍ह्याचा झाला नाही. सरकार बदलल्‍या नंतर निर्णय कसे होतात याचा फरक आता जनतेला दिसत असल्‍याचे त्‍यांनी आवर्जुन नमुद केले.

दरम्यान यंदाचे पावसाचे प्रमाण खुप कमी असल्‍याने पाण्‍याची टंचाई भेडसावणार आहे. यापुर्वी आपण नोव्‍हेंबर पासून आवर्तनाचे नियोजन करीत होतो. आता तर ऑगस्‍टमध्‍येच आपल्‍याला धरणातून पाणी सोडण्‍याची वेळ आली आहे, त्‍याचेही नियोजन काटेकोरपणे करावे लागणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. माजी नगराध्‍यक्ष अभय शेळके यांनी आपल्‍या भाषणात मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी शिर्डी शहरासाठी केलेल्‍या कामाचा आढावा घेतला. ९ ऑगस्‍ट २०२२ रोजी मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी महसूल मंत्री पदाची शपथ घेतली होती. मंत्री पदास एक वर्षे पुर्ण झाल्‍याबद्दल ग्रामस्‍थांच्‍या वतीने त्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !