◻️ माजी मंत्री आ. थोरात व माजी आ. डॉ. तांबे यांच्या हस्ते शिक्षकाना गौरवले जाणार
◻️ आमदार निलेश लंके, सिमंतिनी कोकाटे यांचाही होणार सन्मान
संगमनेर LIVE | संगमनेर मधील पठार भागातील विविध कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या जाणीव जागृती फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक उपक्रम राबवले जात असून दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षकांचा सत्कार केला जातो.
रविवार दिनांक ३ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ३ वा. काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सह्याद्री महाविद्यालयातील के. बी. दादा सभागृह येथे गुणवंत शिक्षकांसह पारनेरचे आमदार निलेश लंके व सिन्नरच्या जि. प. सदस्या सिमंतिनी कोकाटे यांनाही गौरवले जाणार असल्याची माहिती समन्वयक अंतोन मिसाळ व अध्यक्ष बाळासाहेब हेंद्रे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना समन्वयक अंतोन मिसाळ म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या आदर्श शिक्षकांना शिक्षक दिनाच्या निमित्ताने जाणीव फाउंडेशनच्या वतीने आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते दरवर्षी गौरवले जाते.
यावर्षीही महाराष्ट्रातील विविध गुणवंत शिक्षकांसह यशवंत - वेणू पुरस्काराच्या धर्तीवर सौ. कांचनताई बाळासाहेब थोरात २०२३ पुरस्काराने सौ. राणीताई व आमदार निलेश लंके यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच सौ. दुर्गाताई सुधीर तांबे नारीरत्न पुरस्कार - २०२३ ने सिन्नर तालुक्याच्या युवा नेत्या व जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी माणिकराव कोकाटे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
याचबरोबर यावेळी अहमदनगर नाशिक, धुळे, जळगाव, पालघर, ठाणे आणि पुणे जिल्ह्यातील विविध आदर्श शिक्षकांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, बुके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी आमदार सत्यजित तांबे, नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, रणजीतसिंह देशमुख, प्रा. बाबा खरात, प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील, जळगाव शिक्षण संघटनेचे मंगेश भोईटे, आदर्श शिक्षक भाऊसाहेब गोरे आदींसह शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे.
दरम्यान या कार्यक्रमासाठी तालुक्यातील शिक्षण प्रेमी नागरिक व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जाणीव फाउंडेशनचे समन्वयक अंतोन मिसाळ, अध्यक्ष बाळासाहेब हेंद्रे, कार्यकारी अधिकारी बाळासाहेब पुलाटे, अभिजीत पाटणकर, भाऊसाहेब काकड, संदीप काकड आदींसह विविध सदस्यांनी केले आहे.