◻️ अभ्यासपूर्ण व आक्रमकपणे मांडलेल्या प्रश्नांवर सरकारची भंबेरी
संगमनेर LlVE | एका बाजूला राज्यात अनेक विभागात पाऊस पडला नसून शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी सरकार मंत्रिमंडळ विस्तार, दिल्ली वाऱ्या यामध्ये वेळ घालवत असून बोगस बियाणे, खते , वाहतुकीच्या कोंडी, गौण खनिज, मंत्र्यांची अनुपस्थिती यांसह शेतकरी व जनतेच्या विविध प्रश्नांवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी अत्यंत आक्रमकपणे व अभ्यासपूर्ण मांडलेल्या प्रश्नांवर सरकारला घेरले होते. यावेळी अनेक प्रश्नांची सरकारकडून समाधान उत्तरे मिळाली नसून अनेक मंत्र्यांची भंबेरी उडाली.
मुंबई येथे १७ जुलैपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले. यावेळी विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसकडून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सरकारला धारेवर धरले. यामध्ये आमदार थोरात यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडताना काही भागांमध्ये पाऊस न पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशावेळी सरकारने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे अशी मागणी करताना सरकार सध्या फक्त दिल्ली वारी व स्वतःचे आमदार जपण्यामध्ये व्यस्त असल्याची टीकाही केली. याचबरोबर राज्यांमध्ये होत असलेल्या बोगस बियाणे विक्री व खताचा मुद्दा त्यांनी मांडला. याच बरोबर मागील काही महिन्यांमध्ये मराठवाड्यामध्ये बनावट शासकीय अधिकारी बनून काही लोकांनी हप्ते खोरी केल्याचे त्यांनी उघड केले. अशा लोकांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्याबरोबरच मागील वर्षी गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे अद्याप शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. तसेच कांद्याचे अनुदानही मिळाले नाही तेही तातडीने द्यावी अशी मागणी त्यांनी केली.
याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात खताच्या किमती कमी झालेले असताना केंद्र सरकारकडून खतांच्या बाबतीमध्ये नफेखोरी होत असून बियाण्यातील काळाबाजार रोखावा अशी मागणीही त्यांनी केली.
युरिया सारख्या खताबरोबर शेतकऱ्यांना जोड खत खरेदी लागते आहे यामुळे खाजगी व सहकारी कंपन्यांकडून विक्रेत्यांना मुख्य खताबरोबर जोड खत सक्तीने दिली जात आहेत. या सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा असे सांगून कृषी विद्यापीठे अत्यंत सक्षम करताना त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना माहिती द्यावी असे सांगितले
तर सध्या मुंबई -आग्रा रोडवर असलेल्या खड्ड्यांमुळे ठाणे परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत असून या प्रश्नावर आमदार थोरात यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या खड्ड्यांची पाहणी करून तातडीने खड्डे बुजवण्याच्या सूचना दिल्या.
विविध सदस्य आपल्या भागातील मागण्या या सभागृहात मांडत असतात त्यामुळे सभागृहाचा कालावधी वाढवावा प्रत्येक सेशनसाठी संबंधित मंत्र्यांनी उपस्थित असावे अशी मागणीही केली. याचबरोबर मंत्र्याची अनुपस्थिती ही लोकशाही व विधानसभा कार्यप्रणालीसाठी योग्य नसल्याची टीकाही त्यांनी केली .
आमदार थोरात हे विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य असल्याने त्यांनी केलेल्या विविध प्रश्न व सूचनाबाबत विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व संबंधित खात्याच्या मंत्र्यांनीही त्यांचा आदर राखत योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शांत संयमी व अभ्यासू नेते असले आमदार थोरात यांच्या कामाचा आदर करताना सरकारने त्यांचा सन्मान ठेवून प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. काँग्रेस पक्षाचा विरोधी पक्ष नेता होईल असे सांगताना आमदार थोरात यांनी ज्येष्ठ नेते विजय वड्डेटीवार यांची विरोधी पक्ष नेते पदी घोषणा केली.
या पूर्ण अधिवेशनात काँग्रेसने विरोधी पक्षाची भूमिका अत्यंत सक्षमपणे बजावली आहे. यामध्ये आमदार थोरात यांचा सर्वात मोठा पुढाकार राहिला.
सत्यमेव जयते..
खासदार राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईला उच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली. हा निर्णय सत्यमेव जयते असल्याची प्रतिक्रिया देताना आमदार थोरात यांनी म्हटले आहे की हा जनतेचा विजय असून खासदार राहुल गांधी हे सातत्याने जनतेच्या न्याय हक्कासाठी लढत राहतील. यामुळे काँग्रेस पक्षात पुन्हा चैतन्य निर्माण झाले असून २०२४ मध्ये देशात काँग्रेस व इंडिया आघाडीची सत्ता येईल असेही ते म्हणाले.