◻️ शिबिरात १०१ जणांनी केले रक्तदान
संगमनेर LIVE | स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने सहकारमहषी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना व अमृत सांस्कृतिक मंडळ तसेच अर्पण रक्त केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कारखाना कार्यस्थळावर अमृतेश्वर मंदिर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये १०१ व्यक्तींनी रक्तदान केले.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, किरण कानवडे, कार्याध्यक्ष रामदास तांबडे, शरद गुंजाळ, अशोक कवडे, अर्पण रक्तपेढीचे सागर गांगुर्डे, अभिजीत कुलकर्णी, शितल हटक, प्रिया गायकवाड, पुष्पा गावित, अजय बंदाणे, राजेंद्र बड, राजू कोल्हे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रतापराव ओहोळ म्हणाले कि, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात कारखान्याने कायम सामाजिक बांधिलकी राखत विविध उपक्रम राबविले असून रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून विज्ञानानी मोठी प्रगती केली असली तरी प्रयोग शाळेत आजपर्यंत रक्त बनवता आले नाही. वाढणारे अपघात, विविध आजार यामुळे रक्ताची मोठी कमतरता भासत असून तरुणांनी रक्तदानासाठी पुढाकार घेतला पाहिजे. यामुळे आपले आरोग्य चांगले राहत असून दुसऱ्यांचे ही आरोग्य चांगले होते. हीच खरी ईश्वरसेवा असल्याने प्रत्येकाने रक्तदान करावे असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर म्हणाले कि, सध्या महामार्गावर वाढणारे अपघात, आजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेता रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. मात्र मागणीच्या प्रमाणात उपलब्ध रक्तसाठा खूप कमी असून रुग्णांना वेळेवर रक्तपुरवठा होत नाही. रक्तदान ही खरोखर सामाजिक बांधिलकी असल्याचे ही ते यावेळी म्हणाले.