◻️ रोहयोतुन मागेल त्याला काम देण्यासाठी अधिकची कामे सेल्फवर मंजूर करा - जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
◻️ जिल्ह्यामध्ये सुरु असलेल्या १ हजार ४४४ कामावर ७ हजार ४२० मजुर कार्यरत
संगमनेर LIVE (अहमदनगर) | गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे अशीच परिस्थिती राहिल्यास जिल्हा दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने संभाव्य दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहावे. जिल्ह्यात मागेल त्याला काम उपलब्ध होण्यासाठी रोजगार हमी योजनेची कामे अधिक प्रमाणात सेल्फवर मंजूर करून ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.
संभाव्य दुष्काळसदृष्य परिस्थितीच्या बाबतीत करावयाच्या उपायोजनाबाबत सर्व यंत्रणांची संयुक्त आढावा बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्याप्रंसगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते.
यावेळी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्यासह सर्व तालुक्याचे तहसिलदार, गटविकास अधिकारी, संबंधित विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, चालू वर्षात जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. पाऊस न झाल्यास दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा तसेच मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी यंत्रणांनी आवश्यक त्या सर्व उपायोजना कराव्यात. तालुकास्तरावर अधिकारी तसेच ग्रामस्तरावर काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन उपाययोजनांबाबत सुचना देण्यात याव्यात. टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी मागणीप्रमाणे पुरवठ्याचे नियोजन करण्यात यावे. पाण्याचे स्त्रोत उपलब्ध असलेल्या जागांची माहिती अद्यावत करण्यात यावी.
मजुरांच्या हाताला काम मिळण्यासाठी रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या प्रमाणात मंजुर करुन घेण्यात यावीत. प्रत्येक गावात सार्वजनिक स्वरूपाची किमान पाच कामे मंजूर करून ठेवत सर्व यंत्रणांनी रोहयोची अधिकाधिक कामे सुरु करण्याच्यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी दिल्या.
जिल्हयातील संबंधित यंत्रणा व ग्रामपंचायत विभागाकडील एकुण २३ हजार ३५७ कामे शेल्फवर असून या कामांमधुन ६२ लक्ष २२ हजार २१८ मनुष्यदिन निर्माण होणार आहेत. यामध्ये वैयक्तिक लाभाच्या तसेच सार्वजनिक स्वरुपाच्या अशा दोनही प्रकारच्या कामांचा समावेश आहे. आज रोजी जिल्ह्यामध्ये १ हजार ४४४ कामे सुरु असुन त्यावर ७ हजार ४२० मजुर कार्यरत आहेत. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये ३ लक्ष ४१ हजार ५०३ कामे आराखड्यामध्ये असुन त्यामधुन १३ कोटी २७ लक्ष मनुष्य दिवसाचा रोजगार उपलब्ध होऊ शकणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (रोहयो) तळपदे यांनी यावेळी दिली.
जिल्ह्यात येत्या दिवसांमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. सण शांततेत साजरे होतील तसेच या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी दिल्या.
दरम्यान या बैठकीस संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.