◻️भारत जोडोच्या वर्षपूर्तीनिमित्त संगमनेरात काँग्रेसची विराट पदयात्रा
◻️‘भारत जोडो, नफरत छोडो’ या घोषणांनी संगमनेर शहर दुमदुमले
संगमनेर LIVE | खा. राहुल गांधी यांनी भारतीय एकात्मता व लोकशाहीच्या रक्षणासाठी काढलेल्या ऐतिहासिक भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्ती निमित्त संगमनेरात विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भव्य दिव्य पदयात्रेत युवक, महिला, नागरिक यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विविध ठिकाणी झालेले उत्स्फूर्त स्वागतासह भारत जोडो यात्रा ही देशाच्या राजकारणाला व भविष्याला दिशा देणारी ठरली असून सर्व रेकॉर्ड मोडणाऱ्या या यात्रेचा आपल्या सर्वांना अभिमान असल्याचे गौरवोदगार या यात्रेचे समन्वयक तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.
काँग्रेस कमिटीच्या वतीने भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्ती निमित्त संगमनेर नगरपालिका ते नवीन नगर रोड अशी विराट पदयात्रा झाली. या पदयात्रेच्या समारोपप्रसंगी सभेत व्यासपीठावर काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे, नाशिकचे राजाराम पानगव्हाणे, महिला काँग्रेसच्या सचिव उत्कर्षाताई रुपवते, ॲड. माधवराव कानवडे आदींसह संगमनेर तालुक्यातील काँग्रेसच्या सर्व सेलचे पदाधिकारी व विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, काँग्रेस पक्षाला त्यागाची व बलिदानाची मोठी परंपरा आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आयुष्याची दहा वर्ष तुरुंगात काढली. राष्ट्रपिता महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान दिले. हा देश व लोकशाही टिकवण्यासाठी खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी ३ हजार ५६० किलोमीटरची पदयात्रा केली. या पदयात्रेत ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना सोबत घेऊन चालत होते. विविध संघटना व लोकशाहीवर विश्वास असणारे सर्वजण एकत्र येत होते.
महाराष्ट्रात देगलूर पासून सुरू झालेली यात्रा सात जिल्ह्यातून गेली. अत्यंत उत्साहात सर्वांनी सहभाग घेतला. महाराष्ट्रात मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसाद व शेगावची झालेली ऐतिहासिक सभा हे या यात्रेचे मोठे वैशिष्ट्य ठरले. रेकॉर्ड ब्रेक असणारी ही पदयात्रा देशाच्या राजकारणाला व भविष्याला दिशा देणारी ठरली आहे.
ऊन वारा पाऊस असा प्रवास करत या यात्रेतून बंधुत्वाचा संदेश देण्यात आला. तोच संदेश घेऊन आपल्या सर्वांना पुन्हा जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून काम करायचे आहे. देशात व राज्यात वातावरण बदलले आहे. जाती व धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या भाजपाची मोजक्या राज्यांमध्ये सत्ता राहिली आहे.
देशात महागाई, बेरोजगारी वाढली आहे. मणिपुर अशांत आहे, महिलांवर सर्वत्र अत्याचार होत आहे. पंजाब मध्ये शेतकरी आंदोलनामध्ये ७०० लोक मृत्युमुखी पडले. कुस्तीगीर मुलींचे आंदोलन दडपले गेले. मराठा, धनगर यांचे सह विविध समाजाचे आंदोलन दडपले जात आहे. देशापुढे अनेक प्रश्न आहेत मात्र सरकार मूळ प्रश्नांवर भर देण्याऐवजी जनतेचे लक्ष इतरत्र विचलित करत आहे.इडी व सीबीआय यासारख्या स्वायत्त संस्थांच गैरवापर केला जात आहे.
लोकशाही टिकवण्यासाठी इंडिया आघाडीने एकत्र येऊन भाजप पुढे मोठे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे भाजपा घाबरली आहे. आगामी काळात देशात व राज्यात परिवर्तन नक्की असून काँग्रेसचा समतेचा विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे काम करावे असे आवाहनही त्यांनी केले.
माजी आमदार डॉ. तांबे म्हणाले की, लोकशाही टिकवण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी भाजपा विरुद्ध आंदोलनात सहभाग घेतला पाहिजे. देशात सर्वत्र अशांतता आहे, नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. जाती धर्माच्या नावावर होणारे राजकारण हे अत्यंत दुर्दैवी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यावेळी उत्कर्षाताई रूपवते यांनीही मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद कानवडे यांनी केले तर सोमेश्वर दिवटे यांनी आभार मानले. यावेळी हजारो नागरिक व महिला उपस्थित होते.
पदयात्रेचे शहरात अभूतपूर्व स्वागत..
शहरात संपूर्ण पदयात्रेत नागरिकांनी रस्त्यांच्या दुतर्फावरून आमदार थोरात यांच्यावरती पुष्पवृष्टी केली. विविध ठिकाणी महिला भगिनींनी औक्षण केले, तरुणाईचा मोठा जल्लोष, ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजीत या पदयात्रेत रिमझिम पावसातही सर्व समाज बांधव मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. युवकांची उपस्थिती लक्षणीय होती. ‘भारत जोडो, नफरत छोडो’ ‘आ थोरात साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ या घोषणांनी संगमनेर शहर दुमदुमून गेले.