◻️ माणूस माणसाशी माणसासारखा वागणार केव्हा?
◻️ पत्रकार विकास अंत्रे लिखित दुसरी बाजू नक्की वाचा
संगमनेर LIVE | हरेगावात किरकोळ कारणावरून युवकांना झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ आंदोलनाचे रान पेटले आहे. पोलीस, न्यायव्यवस्था यथावकाश आरोपींना शिक्षा सुनवेल. पण हरेगाव नंतर पुन्हा दलित, गरिबांवरील अत्याचाराबाबत नंबर कोणत्या गावचा.. हा प्रश्न निरुत्तरित राहतो.. का वाढतय दिन, दुबळ्यांवरील अत्याचाराच्या घटना? सर्व मानव जात एक समान असूनही माणूस माणसाशी माणसासारखा वागणार केव्हा? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देणारी दैनिक पुण्यनगरीचे वृत्त संपादक विकास अंत्रे यांची दुसरी बाजू नक्की वाचा..
एकीकडे भारत जगाची महासत्ता होण्याच्या वल्गना केल्या जात आहेत, विज्ञान, तंत्रज्ञानातील संशोधनामुळे भारत विश्वगुरूच्या भूमिकेत असल्याचेही जागतिक व्यासपीठावरून सांगितले जात आहे. नुकतेच चंद्रयान ३ च्या माध्यमातून चंद्र आपल्या कवेत आला आहे. जगात पाचव्या क्रमांकावर असलेली अर्थव्यवस्था लवकरच तिसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याचा आशावाद आहे.
भारताविषयी इतके सगळे सकारात्मक चित्र निर्माण झाले असताना प्रत्यक्षात दलित, सवर्णाविषयीची नकारात्मकता मात्र संपायला तयार नाही. हरेगावात चार अल्पवयीन तरुणांना चोरीच्या संशयावरून मारहाण झाली. दलितांच्या द्वेष याबरोबर आर्थिक सबलाकडून दुर्बलावर अन्याय, हे या घटनेमागील महत्वाचे कारण ठरते. एकाला तुपाची पोळी दुसऱ्याला सदा रिकामी झोळी, हा दलितांच्या जगण्यातील संघर्ष जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत त्यांच्यावरील अन्याय, अत्याचाराची मालिका खंडित होणे शक्य नाही.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांवर होणाऱ्या अन्याय - अत्याचाराची दखल घेऊन घटनेद्वारे अस्पृश्यता, दलित द्वेष कमी करण्यासाठी काम केले. याला आता ७३ वर्षे होत आली. १९८९ मध्ये भारत सरकारने दलित अत्याचार प्रतिबंधक कायदाही केला ; पण दलित अत्याचाराच्या घटना कमी व्हायला तयार नाहीत. या घटनांच्या मुळाशी जाऊन दलित अत्याचार वाढीमागच्या कारणांचा शोध घेतला असता, दलित द्वेषाबरोबर दलितांच्या भाकरीच्या लढाईत याची उत्तरे सापडतात.
देशाला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षे पूर्ण झाली, तरी दलितांच्या आर्थिक स्थितीमध्ये फारशी सुधारणा झाली नाही. बहुतांशी दलित भूमिहीन असल्याने त्यांना हीन दर्जाची कामे करावी लागतात. ती नाकारण्याचे स्वातंत्र्य व्यवस्थेने त्यांना दिले नाही. एखाद् दुसऱ्या दलित तरुणाने असे काम किंवा त्याच्या पोटी मिळणारी मजुरी, याबाबत आवाज उठवला, तर व्यवस्थेतील प्रस्थापित त्याला धडा शिकवायला किंवा त्याला कायमचा संपवायला तत्पर असतात.
हरेगाव प्रकरणातील चारपैकी तीन अल्पवयीन मुले दलित आहेत. इतर एक मुलगा दुसऱ्या समाजाचा आहे. मिळेल ते काम करून ही मुलं कुटुंबाला हातभार लावणारी. एक वर्षापूर्वी गलांडे कुटुंबियांच्या घरी झालेल्या कबुतर चोरी प्रकरणात संशयित म्हणून आरोपींनी त्यांना ज्या अमानुष पद्धतीने मारहाण केली, ती पाहता, तशी मारहाण आर्थिकदृष्ट्या सबळ वर्गातील मुलांना करता आली असती का? हरेगाव मारहाण प्रकरणाची घटना सोशल मीडियामुळे उजेडात आल्यावर मंत्री, नेते, कार्यकर्ते व पोलीस यंत्रणा अॅक्टीव्ह झाली.
या प्रकरणातील सातपैकी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. एक आरोपी अद्याप फरार आहे. आरोपींवर कठोर कारवाई होण्यासाठी आंदोलने, मोर्चे झाले. पोलीस, न्याय व्यवस्था त्यांचं काम करेल, पुढे काय? हरेगाव घटनेच्या वार्तांकनाची शाई वाळत नाही, तोच दुसरी दलित किंवा गरिबावरील अन्याय अत्याचाराची घटना समोर येते. दलित किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बलावरील अत्याचाराची मालिका खंडित होणार कधी? हा खरा प्रश्न आहे.
नॅशनल क्राईम रेकॉर्डने जुलै २०२२ मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये २०२१ मध्ये देशात दलित अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे मध्य प्रदेशमध्ये दाखल झाले. २०१८ ते २०२१ या चार वर्षांत या राज्यात ५१.७ टक्क्यांनी दलित व गोर गरीबावरील अन्याय, अत्याचारांत वाढ झाली. मध्य प्रदेशखालोखाल राजस्थान २४ टक्के, ओडिसा ७.६ टक्के, महाराष्ट्र ७.१३ टक्के अशा दलित अन्याय अत्याचारांच्या घटनांत वाढ होत गेली आहे. दलित अत्याचारांच्या घटनांमध्ये महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर असला, तरी पुरोगामी म्हणवणाऱ्या आपल्या राज्यास हा क्रमांक भूषणावह नाही.
ज्या राष्ट्रात लोकल ते ग्लोबलच्या गप्पा मारल्या जातात, विज्ञान तंत्रज्ञानामुळे जग कवेत आले म्हणून धर्म, पंथाच्या पलिकडे जाऊन शिकलेल्यांना संधी दिल्या जातात, त्याच राष्ट्रात शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांना मात्र माणूस म्हणून जगण्याचा हक्कही नाकारला जातो, हे देश म्हणून भारतासाठी नक्कीच चांगले नाही. आपल्या आजूबाजूचे शेजारी पाकिस्तान, अफगानिस्तान, श्रीलंका, म्यानमार, या राष्ट्रात सध्या सुरू असलेला विध्वंस बघता आपल्या देशातील लोकशाही तत्त्वाचे हार्डवेअर अद्याप पक्के असल्याचे जाणवते. परंतु या लोकशाहीची अंमलबजावणी करणारे सॉफ्टवेअर मात्र दोषपूर्ण आहे.
शासन व्यवस्था, नोकरशाही भ्रष्ट झाली आहे. पोलीस यंत्रणा पुरती किडली आहे. न्याय व्यवस्था खिळखिळी झाली आहे. हे कटू वास्तव पाहता दलित, गारगरिबांना न्याय देणार कोण? हा प्रश्न जरी खरा असला, तरी आधी उल्लेख केल्याप्रमाणे अजून देश, समाज म्हणून आपल्यातील लोकशाहीचे हार्डवेअर भक्कम असल्याने परिवर्तनाला वाव आहे. शिकलेल्या तरुणांनी मानवतेला धर्म माणून जात घालवण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. यासाठी शाळा, महाविद्यालये, अशा देशाचं भविष्य घडविण्याच्या ठिकाणी जाणीवपूर्वक ‘माणूसपण’ या एकाच जातीचे उदात्तीकरण करण्यासाठी प्रबोधन करणे आवश्यक आहे.
हे होत नसल्यामुळे आज हरेगाव उद्या आणखी दुसरे एखादे गाव किंवा ठिकाण बदलेल. पण दुर्बलावरील अन्याय, अत्याचार थांबणार नाही. ज्यांच्यावर अन्याय झाला, त्यांना न्याय देण्यासाठी आपली व्यवस्था किती तत्पर आहे, हे आपणा सर्वांना चांगलेच ज्ञात आहे. व्यवस्थेची ही काळी बाजू लक्षात घेता अन्याय, अत्याचार थांबविण्यासाठी जसे प्रबोधन गरजेचे आहे, तसे या घटनांतील अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी लढ्याशिवाय पर्याय नाही. हरेगाव मारहाणीच्या घटनेनंतर दलितांबरोबर संपूर्ण समाज एकवटला. सर्वांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली.
समाजातील ही एकी खरी तर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, या महापुरुषांचा विचार जपणारी आहे. ती पाहता बाबासाहेबांवर लिहिलेल्या भीमगितांच्या या ओळी आठवल्याशिवाय राहणार नाही. ‘तुम्ही करा कितीही हल्ला, लय मजबूत माझ्या भिमाचा किल्ला.’
***लेखक दैनिक पुण्यनगरीचे वृत्त संपादक आहेत.
विकास अंत्रे :- मो. 9421556882