◻️ ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न
◻️ दूध व्यवसायामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबुतीसह रोजगार निर्मिती
◻️ सरकारने दूध व्यवसायालाही साखर व्यवसायाप्रमाणे सहकार्य व संरक्षण द्यावे - रणजितसिंह देशमुख
संगमनेर LIVE | राजहंस दूध संघाने कायम दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठी मदत केली आहे. आगामी काळात कमी गाई मध्ये गुणवत्ता पूर्ण जास्त दूध उत्पादन निर्माण करून सहकारी संघाचे दूध संकलन वाढविले पाहिजे. राजहंस दूध संघाने कायम चांगला भाव दिला आहे. यामधून मागील वर्षात ४०० कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले असून दूध व्यवसायामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूतीसह रोजगार निर्माण झाला असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, दूध व्यवसायाने ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठा वाटा उचलला असून सहकारी दूध संघाचा यावर्षी ५३० कोटींचा टर्नओव्हर हा अत्यंत कौतुकास्पद ठरणारा असून ४०० कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या पदरात मिळाले आहे. राजहंस दूध संघाने कायम दूध उत्पादक, शेतकरी यांना मोठी मदत केली आहे. उच्चांकी भाव देण्याबरोबरच दूध उत्पादन वाढीसाठी विविध योजना राबवल्या आहेत. सहकारी दूध संघामुळे खाजगींवर नियंत्रण आहे. हा संघ प्रत्येकाने जपला पाहिजे.
कोरोना काळात रणजितसिंह देशमुख यांच्या पुढाकारातून सरकारने दररोज दहा लाख लिटरची दूध पावडर करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे एक ही दिवस बंद राहिला नाही. अशा संकटाच्या वेळी खाजगी संघ मदत करत नाही.
यापुढील काळात खाजगी दूध संघाच्या आमिषाला बळी न पडता सर्व उत्पादकांनी सहकारी संघ जपला पाहिजे. तसेच कमी गाईंमध्ये जास्त गुणवत्तेचे दूध निर्माण करणे गरजेचे आहे. यामुळे उत्पादन खर्चही कमी होईल आणि दुधाला चांगला भावही मिळेल.राजहंस दूध संघाचा मुक्त संचार गोठा व मुरघास पॅटर्न हा राज्यभर राबवला जात असल्याचेही ते म्हणाले.
रणजितसिंह देशमुख म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वांवर वाटचाल करत आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राजहंस दूध संघाची यावर्षीची वार्षिक उलाढाल ५३० कोटी इतकी उच्चांकी होती. दूध संघाच्या वाटचालीतील हा मोठा टप्पा असून यावर्षी ४०० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या पदरात घातले गेले आहे. राजहंस मेडिकलच्या माध्यमातून उत्पादकांना कमी दराने औषधी दिले जात आहेत तसेच सॉर्टेड सिमेंट ही योजना राबवली जात असून यामधून ९५ टक्के उच्च प्रतीच्या कालवडी निर्माण होत आहेत.
दूध संघाने देशात प्रथमच स्मार्ट कार्ड ही अभिनव संकल्पना राबवली असून या अंतर्गत कार्डधारकांना एक लाख रुपयांचा अपघाती विमा, औषधांमध्ये पाच टक्के सवलत, राजहंस च्या स्टॉलवर वस्तू खरेदीसाठी मोठी सवलत दिली जाणार याचबरोबर आगामी काळात दूध संघात दीड मेगावॅट सोलर निर्मिती प्रकल्प हाती घेण्यात येणार असून गावोगावी बायोगॅस प्लांट योजना राबवली जाणार आहे. वर्षभर रात्रंदिवस चालणाऱ्या दूध व्यवसाय कामात सर्व शेतकरी, उत्पादक ,अधिकारी, कर्मचारी या सर्वांची सामूहिक योगदान असल्याने यश मिळत असल्याचेही ते म्हणाले.
मा. आ. डॉ. तांबे म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून दूध हा शाश्वत व्यवसाय आहे. दूध व्यवसायाने राज्यभरात बेरोजगारी कमी करण्यासाठी मोठे काम केले आहे. हा व्यवसाय वाढवावा याकरता सरकारने पाठबळ दिले पाहिजे असेही ते म्हणाले.
सरकारने दूध व्यवसायालाही साखर व्यवसायाप्रमाणे सहकार्य व संरक्षण द्यावे - रणजितसिंह देशमुख
ऊस आणि दूध हे शाश्वत व्यवसाय आहे. साखर व्यवसायात मोठे शेतकरी आहेत मात्र दूध व्यवसायात लहान कुटुंबे आहेत. राज्यामध्ये दीड कोटी कुटुंब तर देशात आठ कोटी कुटुंब दूध व्यवसायात असून या व्यवसायाने ग्रामीण जीवनामध्ये आनंद निर्माण केला आहे. मात्र सरकार साखर व्यवसायाला जसे तातडीने मदत करते तशी मदत दूध व्यवसायाला करत नसल्याची खंत राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी व्यक्त केली असून या व्यवसायाला ही सरकारने सहकार्य करावे असे आवाहन हि त्यांनी केले.