◻️ संगमनेर शेतकी सहकारी संघाची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
संगमनेर LIVE | राज्यातील अनेक शेतकी संघ मोडकळीस आले असताना संगमनेरचा शेतकी संघ मात्र दिमाखात उभा आहे. खाजगी बरोबर स्पर्धा करतानाही काटकसर व चिकाटी यामुळे शेतकी संघांने जनतेचा मोठा विश्वास संपादन केला असून मागील ६४ वर्षांची वाटचाल ही कौतुकास्पद राहिली असल्याचे गौरवोदगार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा मा. महसूल व कृषिमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.
जिल्हा सहकारी बँकेच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सभागृहात संगमनेर शेतकी सहकारी संघाच्या ६४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी चेअरमन संपतराव डोंगरे होते. व्यासपीठावर मा. आमदार डॉ. सुधीर तांबे, ॲड. माधवराव कानवडे, इंद्रजीत थोरात, लहानुभाऊ गुंजाळ, गणपतराव सांगळे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, शेतकी संघाच्या वाटचालीत तीर्थरूप भाऊसाहेब थोरात, स्वर्गीय प्रभाकरराव भोर, बाळासाहेब गुंजाळ, स्व. शिवाजीराव थोरात या सर्वांसह विविध पदाधिकाऱ्यांचे मोठे योगदान लाभले आहे. अत्यंत काटकसर व चिकाटीतून या संघाची वाटचाल सुरू असून संघाला खाजगीकरणाची मोठी स्पर्धा आहे. मात्र गुणवत्ता पारदर्शक काम व सचोटी यामुळे ग्राहकांचा मोठा विश्वास शेतकी संघाने निर्माण केला आहे. शेतकी संघाचे गुणवत्तेचे पेट्रोल हे वैशिष्ट्य ठरले आहे. यामुळे येथील पेट्रोलला ग्राहकांची मोठी मागणी असते.
सहकारातून तालुक्यात समृद्धी निर्माण झाली असून वसुलीची परंपरा तालुक्याने कायम जपली आहे. यावर्षी जिल्हा बँकेच्या वसुली जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असताना ९९.७० टक्के इतकी मोठी वसुली दिली असल्याचेही ते म्हणाले.
मा. आ. डॉ. तांबे म्हणाले की, केंद्र सरकार हे भांडवलदारांना पूरक काम करत असून शेती व सहकार व्यवसाय मोडीत काढत आहे. खाजगीकरणाला प्राधान्य देत गोरगरिबांच्या जीवनात समृद्धी निर्माण करण्याच्या सहकाराच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जात आहे. मात्र हा सहकार टिकवण्यासाठी सर्वांनी कटीबद्ध राहिले पाहिजे असेही ते म्हणाले.