◻️ बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली नगरच्या ऐतिहासिक किल्यामधून पदयात्रा सुरु
◻️ उत्तर महाराष्ट्रातील साडेतीन हजार गावे जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून एकमेकांशी जोडली जाणार
संगमनेर LIVE (मुंबई) | आपल्याला देश वाचवायचा आहे, सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन या देशाच्या विकासात योगदान द्यायचे आहे आणि काँग्रेस व भारतीय संस्कृतीच देशाला वाचवू शकते. काँग्रेस विचार आणि भारतीय संस्कृतीच देशाला वाचवू शकते. आपल्यात भेदभावाला थारा नाही हा विचार भारतीय संस्कृतीने आपल्याला दिला आणि तोच विचार काँग्रेस पुढे नेण्याचे काम करत आहे, जनसंवाद यात्रा ही प्रेमाचा विचार घेऊन जनमानसात जाणार आहे आणि तोच विचार काँग्रेस पुढे नेण्याचे काम करत आहे. असे आ. बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा साक्षीदार असलेल्या नगरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातून उत्तर महाराष्ट्रातील जनसंवाद यात्रेला सुरुवात करण्यात आली. भुईकोट किल्ल्यातील पंडित जवाहरलालजी नेहरू यांच्यासह क्रांतिकारकांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
यावेळी आ. लहू कानडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, शहराध्यक्ष किरण काळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, अशोक कानडे, मनोज गुंडेचा, उत्कर्ष रुपवते, नलिनी गायकवाड, संजय झिंगे यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व लोक सहभागी झाले होते. उत्तर महाराष्ट्रातील साडेतीन हजार गावे जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून एकमेकांशी जोडली जाणार आहेत.
भाजपा सरकारवर तोफ डागत आ. थोरात म्हणाले की, मराठा समाज या सरकारकडे आशेने पहात होते पण सरकार काहीच हालचाल करत नसल्याने त्यांची निराशा झाली व आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावर आली. मविआ सरकार असताना अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणासाठी उपसमिती स्थापन करण्यात आली होती, या समितीने सातत्याने मराठा आरक्षणासाठी पाठपुरावा केला पण मागील दिड वर्षात शिंदे सरकारने मराठा आरक्षणासाठी काहीही केले नाही. इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीचा प्रभाव देशभर जाणवू लागल्याने जालन्यातील घटना घडवली काय अशी शंका येते. वन नेशन, वन इलेक्शन व्यवहार्य आहे का हेसुद्धा तपासण्याची गरज आहे, असे आ. थोरात म्हणाले आहेत.