◻️ २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील नवोदित विद्यार्थाचा स्वागत समारंभ संपन्न
संगमनेर LIVE (पारनेर) | पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मुलांनी उच्च शिक्षित होवून स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे हे स्वप्न प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पूर्ण होत असल्याचे समाधान आहे. पद्मश्रीनी दिलेला स्वावलंबनाचा विचार घेवूनच संस्थेची वाटचाल ना. राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे सुरू असल्याचे प्रतिपादन जिल्हा परीषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अळकुटी ता. पारनेर येथे पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका प्रथम वर्ष २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील नवोदित विद्यार्थांच्या स्वागत समारंभ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर काशिनात्त दाते, कैलास तांबे, दिनेश बाबर, राहुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांशी संवाद साधतना त्या म्हणाल्या की, या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्या त्या विभागाची अत्यंत सखोल माहिती अत्याधुनिक माध्यमातून शिकविली जाते. विद्यार्थ्यांची उपस्थिती ही अत्यंत काटेकोर पणाने तपासली जाते. यामुळे साहजिकच गुणवत्तेत हे विद्यार्थी इतर महाविद्यालयाच्या तुलनेत कायम सरस ठरत असल्याचा इतिहास संस्थेने निर्माण केले असल्याचे सांगून फक्त शिक्षणच नाही महाविद्यालयात विद्यार्थ्यांना त्यांचे आयुष्य घडविण्याचे संस्कार केले जातात. पुस्तकी ज्ञाना बरोबरच व्यावहारिक ज्ञान हे देखील या ठिकाणीं शिकविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
नवनवीन तंत्रज्ञानची कास धरून संस्थेने ज्ञानदानाचे कार्य सुरू ठेवले आहे. महाविद्यालयातून पास झालेले आज असंख्य विद्यार्थी हे देश परदेशात अत्यंत चांगली जवाबदारी विविध क्षेत्रात पार पाडत आहेत. अशा विद्यार्थ्यांचे मेळावे हे देखील कुतूहलाचा विषय ठरला असून, संस्था केवळ उच्च शिक्षण देवून थांबत नाही तर त्यांना नौकरी, व्यवसायासाठी सर्वोतोपरी सहकार्य करते असल्याचे सौ. विखे पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी सदानंद हिरेमठ, प्रा. दिघे, सोनाली साळके, अश्विनी थोरात, शुभांगी साळुंखे, सचिन वराळ, भाऊसाहेब पाटील, डॉ. भास्कर शेवाळे तसेच नवोदित विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच कर्मचारी उपस्थित होते.