कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती
◻️ शासन निर्णय निर्गमित ; पहिल्या हप्त्यापोटी १७२० कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता
संगमनेर LlVE (मुंबई) | प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेतील पहिल्या हप्त्यापोटी १७२० कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली. याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित झाला आहे, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
सन २०२३-२३ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये 'नमो शेतकरी महासन्मान निधी' ही योजना उपमुख्यमंत्री व तत्कालीन वित्त मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घोषित केली होती. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी रुपये ६ हजार या अनुदानामध्ये राज्य शासनाच्या आणखी ६ हजार इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्माननिधी ही योजना राबवण्यास जून २०२३ मध्ये मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार या योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै २०२३ या कालावधीच्या पहिल्या हप्तापोटी १७२० कोटी इतका निधी वितरित करण्यास आज मान्यता देण्यात आली आहे.
निधीचे वितरण पीएफएमएस प्रणालीतून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केले जाणार आहे. पी. एम. किसान योजनेप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मॉड्युल महाडीबीटी पोर्टलवर विकसित करण्याचे काम महाआयटी कडून गतीने सुरू आहे. तांत्रिक कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत, असेही शेवटी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.