एक ते दिड वर्षात १० हजार युवकांना रोजगार उपलब्‍ध होणार - ना. विखे पाटील

संगमनेर Live
0
◻️ मंत्री विखे पाटील यांची संगमनेर येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्‍याची बैठक

◻️ नगर, शिर्डी आणि सुपा येथील औद्योगिक वसाहतींच्या विस्‍तारी करणाची प्रक्रीया सुरु 

संगमनेर LIVE | जिल्‍ह्यातील युवकांना जिल्‍ह्यातच रोजगार निर्माण करण्‍यासाठी केंद्र आणि राज्‍य सरकारच्‍या सहकार्याने नगर, शिर्डी आणि सुपा येथील औद्योगिक वसाहतींचा विस्‍तार करण्‍याची प्रक्रीया सुरु झाली आहे. पुढील एक ते दिड वर्षात शिर्डी येथे विकसीत होणाऱ्या औद्योगिक वसाहतीमधून किमान १० हजार युवकांना रोजगार उपलब्‍ध करुन देण्‍याचा आराखडा तयार करण्‍यात येत असल्‍याची माहीती महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या शिर्डी येथील कार्यक्रमाच्‍या पार्श्‍वभूमीवर मंत्री विखे पाटील यांनी भारतीय जनता पार्टीच्‍या पदाधिकारी आणि कार्यकर्त्‍यांची बैठक घेवून कार्यक्रमाच्‍या नियोजनाचा सविस्‍तर आढावा घेतला. तालुक्‍यातून बहुसंख्‍येने नागरीकांनी या सभेत सहभागी होण्‍याच्‍या दृष्‍टीने पक्षाच्‍या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्‍न करावेत असे आवाहन करुन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा हा जिल्‍ह्याच्‍या विकासासाठी आणि युवकांच्‍या भविष्‍यासाठी मोठी संधी ठरणार असल्‍याचे त्‍यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले. याप्रसंगी सभेच्‍या प्रचारार्थ तयार करण्‍यात आलेल्‍या रथाचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला.

या बैठकीस जेष्‍ठनेते बापूसाहेब गुळवे, वंसतराव देशमुख, वसंतराव गुंजाळ, तालुका अध्‍यक्ष सतिष कानवडे, शहर अध्‍यक्ष श्रीराम गणपुले, राष्‍ट्रवादीचे जिल्‍हाध्‍यक्ष कपिल पवार, शिवसेनेचे शहर अध्‍यक्ष सोमनाथ कानकाटे, ज्ञानेश्‍वर कर्पे, जावेद जहागिरदार, अमोल खताळ, राम जाजू, किशोर नावंदर, राजेंद्र सांगळे, सदाशिवराव थोरात, राजेंद्र सांगळे, रविंद्र थोरात, अशोक कानवडे, शरद गोर्डे, बुवाजी खेमनर, शौकत जहागिरदार, रऊफ शेख, प्रशांत वामन आदि पदाधिकारी कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.

आपल्‍या भाषणात मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली देशाची प्रगती होत असताना त्‍यांच्‍या निर्णयांचा प्रत्‍येक लाभ हा गावपातळीपर्यंत मिळाला आहे. कोव्‍हीड संकटापासूनची सर्व परिस्थिती आपण अनुभवली. मोदीजींचे नेतृत्‍व खंबिरपणे उभे राहील्‍यामुळेच देश या संकटातून बाहेर पडला. आज जगामध्‍ये देशाची प्रतिमा एक विकसनशिल भारत म्‍हणून निर्माण झाली आहे. जी २० परिषदेचे मिळालेले अध्यक्षपद हा संपूर्ण भारताचा गौरव असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

आज त्‍यांच्‍या मार्गदर्शनाखाली राज्‍यातील महायुतीचे सरकार निर्णय घेत आहे. १ रुपयात पीक‍विमा योजनेप्रमाणेच आता पशुधनासाठी पीकविमा योजना सुरु करण्‍याचा शासन विचार करीत आहे. खरेतर दूध संघानी अशी योजना सुरु करायला हवी होती, पण ते त्‍यांच्‍याकडून न झाल्‍याने शासनच आता या योजनेची अंमलबजावणी करेल असे आश्‍वासित करुन, ना. विखे पाटील म्‍हणाले की, केंद्र आणि राज्‍य सरकारच्‍या माध्‍यमातून जिल्‍ह्याच्‍या विकासाचे काम सुरु आहे. वंदे भारत एक्‍सप्रेस, समृध्‍दी महामार्ग ही मोठी उपलब्‍धी विकासाच्‍या दृष्‍टीने झाली आहे. या पायाभूत सुविधांचा उपयोग करुन, जिल्‍ह्यातील तरुणांना स्‍थानिक पातळीवरच रोजगार निर्माण करणाचा प्रयत्‍न आपला आहे.

आज रोजगारासाठी युवक बाहेर जात आहेत, स्‍थानिक पातळीवर असलेल्‍या सहकारी औद्योगिक वसाहतींचे एमआयडीसीमध्‍ये रुपांतर यापुर्वीच व्‍हायला हवे होते परंतू ते न झाल्‍यामुळे येथे रोजगार उपलब्‍ध होवू शकला नाही. शिर्डी येथे होवू घातलेली औद्योगिक वसाहत ही आपल्‍या भागातील तरुणांना मोठी संधी ठरणार असून, ५०० एकर जागा देण्‍याचा निर्णय राज्‍य सरकारने घेतला आहे. आय.टीपार्क, महिंद्रा अॅन्‍ड महिंद्रा कंपनी सारखे प्रकल्‍प येथे यावेत म्‍हणून आपले बोलणे झाले आहे.  त्‍या दृष्‍टीने आराखडा तयार करण्‍याचे काम सुरु झाले असून, पुढील एक ते दिड वर्षात किमान १० हजार युवकांना रोजगार उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी केंद्र आणि राज्‍य सरकारच्‍या स्‍तरावरुन काम सुरु झाले असल्‍याचे ना. विखे पाटील यांनी सांगितले.

मंत्री विखे पाटील यांनी निळवंडे येथ धरणस्‍थळी भेट देवून कार्यक्रमाच्‍या नियोजनाचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी धरणस्‍थळी जावून या धरणाचे लोकार्पण करणार आहेत. जलपुजन करण्‍याचे नि‍योजनही करण्‍यात येणार असल्‍याने प्रशासनाने धरण स्‍थळावर केलेल्‍या तयारीची पाहाणी मंत्री विखे पाटील यांनी केली. माजी आ. वैभव पिचड, शिवाजीराव धुमाळे यांच्‍यासह जलसंपदा, महसूल पोलिस विभागाचे आधिकारी उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !