फादर हार्मन बाखर पुरस्काराने जितेश लोढा, आश्विनी गोरे, मनिषा वाघ सन्मानीत
◻️ शिक्षण आणि पाणलोट क्षेत्रासाठी योगदानाबद्दल सन्मान
◻️ फादर हार्मन बाखर यांचे दरेवाडी परीसरात पाणलोट क्षेत्राचे मोठे कार्य
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील दरेवाडी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असणारे शिक्षक जितेशकुमार लोढा, आश्विनी गोरे व मनिषा वाघ यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत ग्रामपंचायत दरेवाडी व इंडो जर्मन वॉटरशेड प्रकल्प यांच्या संयुक्त विदयमाने देवमाणूस, कृषीभूषण फादर हार्मन बाखर स्मृती पुरस्काराने या तीनही शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
१९९६ ते २०१० या कालखंडात जर्मनीहून आलेले धर्मगुरु फादर हार्मन बाखर यांनी दरेवाडी परीसरात पाणलोट क्षेत्राचे मोठे कार्य उभे केले. दुष्काळग्रस्त दरेवाडी भागाला या देवमाणसाने जलमय केले. वयाच्या ९८ व्या वर्षी २०१९ मध्ये त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी १२ आक्टोबर रोजी त्यांच्या जयंतीच्या दिवशी कृषी, शिक्षण, कला, इत्यादी क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करण्यात येतो.
गेली आठ वर्षापासून जितेशकुमार लोढा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरेवाडी येथे कार्यरत आहेत. २०१५ मध्ये शाळेची पटसंख्या ५५ होती तर ती पटसंख्या आज दुप्पट झालेली आहे. शाळेतील भौतिक व शैक्षणिक विकासाचा उंचावलेला आलेख पाहून गावातील अनेक लोकांनी आपली मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून काढून या शाळेत टाकली आहे. जितेश लोढा लायन्स क्लब संगमनेर सफायर या संस्थेकडून शाळेसाठी बॅचेस, कॉम्प्युटर, वॉटर फ्युरीफायर, पाण्याची टाकी, पॅड, ग्रंथालयची पुस्तके, बस्कर पट्टया इत्यादी भौतिक सुविधा उपलब्ध करून घेतल्या आहेत.
या तीन शिक्षकांनी गावातील लोकांचे प्रबोधन करून त्यांना शाळा व शिक्षणाचे महत्व पटवून दिले व त्यांच्याकडून जवळपास एक लाख रुपयाची देणगी मिळवून शाळेचे संपूर्ण रंगकाम, बोलक्या भिंती, साउंड सिस्टीम यांसारख्या अनेक भौतिक सुविधामध्ये वाढ केली आहे. शिक्षक लोढा यांच्या प्रयत्नातून संगमनेर येथील जैन युथ महिला मंडळाकडून दहा हजार रूपये किमतीचे सर्व प्रकारच्या खेळाचे साहित्य उपलब्ध करून घेतले आहे.
आज शाळेत इयत्ता पहिलीपासून ते सातवी पर्यत चे विद्यार्थी शिक्षण घेत आहे. पाच शिक्षकांची आवश्यकता असून सुद्धा हे तीनच शिक्षक आपले काम प्रामाणिकपणे करत आहे व विद्यार्थ्यांना उच्च दर्ज्याचे शिक्षण देत आहे. विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप, नवोदय यांसारख्या स्पर्धा परीक्षांची सुद्धा तयारी उत्कृष्ट रित्या करून घेतली जाते.
या शिक्षकांनी शाळेच्या केलेल्या प्रगतीची दखल घेत ग्रामपंचायत दरेवाडी व इंडो जर्मन वाटरशेड प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मानीत करण्यात आले. यावेळी दरेवाडी गावचे सरपंच आनंदा दरगुडे, उपसरपंच दत्तु गायकवाड, वि. वि. का. सह. सोसा. चेअरमन जनार्धन मैड, इंडो जर्मन प्रकल्प अधिकारी दाते, संचालक शिवाजी कारंडे, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष सुनील आव्हाड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश महाराज आव्हाड, ग्राम पंचायत सदस्य वंदना मैड, मीना पवार उपस्थित होते.