उंबरी येथिल शेतकरी बचत गटाकडून श्री स्वामी समर्थ केंद्राला ५० हजार रुपये दान
◻️ जिल्हाध्यक्ष रावसाहेब शेजुळ याच्यांकडे सभासदाकडून चेक प्रदान
◻️ सभासदांना दिवाळीनिमित्त किराणा तसेच तेल डब्याचे वाटप
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील अतिशय पारदर्शक कारभारासाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या श्री स्वामी समर्थ शेतकरी बचत गटाची वार्षिक सभा नुकतीच संपन्न झाली असून यावेळी बचत गटाच्या भाग भांडवलावर मिळालेल्या नफ्यातून श्री स्वामी समर्थ केंद्राला ५० हजारांची रक्कम दान करण्याबरोबरच सभासदांना दिवाळीनिमित्त किराणा तसेच तेल डब्याचे वाटप करण्यात आले आहे.
सरकार कडे नोंदणीकृत असलेला व १०० सभासद संख्या असलेल्या श्री स्वामी समर्थ शेतकरी बचत गट हा ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर चालत असून पंचक्रोशीत आपल्या पारदर्शक व्यवहार तसेच स्वतंत्र अॅपसाठी ओळखला जातो. नुकतीच या बचत गटाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यावेळी बचत गटकडे ९ लाख रुपये भाग भांडवल झाले असून त्यामध्ये बचत गटातील सभासदांना नाममात्र व्याज दराने ८ लाख ५६ हजार २८६ रुपये ९० सभासदाना वाटप करण्यात आले आहे.
यावेळी बचत गटाला मिळालेल्या व्याजातील ५० टक्के रक्कम ही श्री. स्वामी समर्थ केंद्रास दान म्हणून देण्याचे ठरल्यानंतर अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष रावसाहेब शेजुळ यांच्याकडे ती रक्कम चेक द्वारे बचत गटाच्या सर्व सभासदांनी सोपवली आहे. तर उरलेल्या रकमेतून सभासदांना दिवाळीनिमित्त किराणा, तेल डबा, तसेच बक्षीस देखिल देण्यात आले आहे.
दरम्यान याप्रसंगी बचत गटाचे अध्यक्ष मारुती भिमाजी सारबंदे, सचिव अशोक माधव भुसाळ, चिमाजी भुसाळ, संजय मैड, हरिष उंबरकर, प्रशांत सारबंदे, भगवान मैड, बापूसाहेब भुसाळ, सुरेश भुसाळ याच्यासह १०० सभासद सदस्य उपस्थित होते. यावेळी सागर दिघे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बचत गटाबाबत भरभरून बोलताना सभासदांनी संपूर्ण व्यवहार आम्हाला अॅपच्या माध्यमातून माहिती दिसत असल्यामुळे संपूर्ण हिशोब हा कधीही आणि केव्हाही स्वतःच्या मोबाईल मध्ये पाहण्यास मिळत असल्याने विश्वासार्हता वाढली असल्याचे सांगून दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याप्रसंगी सभासदासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.