◻️ लोहारे येथे मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते निळवंडे पाण्याचे जलपुजन
◻️ ग्रामदैवत अवजीनाथ बाबा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास केले अभिवादन
◻️ डाव्या कालव्याप्रमाणेच उजव्या कालव्यातही लवकरच पाणी सोडण्याचे नियोजन
संगमनेर LlVE | निळवंडे धरणाचे पाणी कालव्यांच्या माध्यमातून गावात आले, हीच खरी आपल्यासाठी दिवाळी ठरली आहे. वर्षानुवर्षांची पाण्याची प्रतिक्षा आता संपली आहे. निळवंड्याचे पाणी मिळण्यासाठी राज्यात आपले सरकार सत्तेवर यावे लागले. शेवटच्या गावाला पाणी मिळेल असे नियोजन करण्यात आले असून, एकही शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
संगमनेर तालुक्यातील लोहारे येथे मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते निळवंडे पाण्याचे जलपुजन करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी लोहारे ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामस्थांच्या वतीने मंत्री विखे पाटील यांचे स्वागतही जल्लोषात करण्यात आले. लोहारे ग्रामस्थांसह भाजपाचे तालुका अध्यक्ष वैभव लांडगे, शरद गोर्डे, हरिष चकोर यांच्यासह विविध गावांचे सरपंच आणि सदस्य मोठ्या सख्येने उपस्थित होते. प्रारंभी मंत्री विखे पाटील यांनी लोहारे गावचे ग्रामदैवत अवजीनाथ बाबा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, निळवंडे धरणाच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले हेच आपल्या दृष्टीने मोठे भाग्य ठरले आहे. प्रधानमंत्री आल्याने धरणाच्या भविष्यातील कामासाठी कोणत्याही निधीची कमतरता पडणार नाही. डाव्या कालव्याप्रमाणेच उजव्या कालव्यातही लवकरच पाणी सोडण्याचे नियोजन आहे. अकोले तालुक्यातील उच्चस्तरीय कालव्यांचे कामही पुर्ण झाले असून, या कालव्यातूनही पाणी देण्याचे नियोजनही विभागाने केले आहे.
अनेक वर्षे सर्वच गावांना पाण्याची प्रतिक्षा होती. राज्यात युती सरकार आल्यानंतर या कामाला गती मिळाली. त्यामुळेच कालव्यांव्दारे पाणी येवू शकले, ही खऱ्याअर्थाने आपल्यासाठी दिवाळी ठरली आहे. आवर्तनाचा कालावधी वाढविल्यामुळे शेवटच्या गावाला पाणी देण्याचे नियोजन असून, जलसंपदा विभागाच्या आधिकाऱ्यांनीही रात्रंदिवस घेतलेल्या मेहनतीमुळे पाणी पोहचत असल्याचे समाधान ना. विखे पाटील यांनी व्यक्त केले.