काँग्रेसच्या वतीने हिवरगावपावसा टोल प्रशासनाला रस्ता दुरुस्तीचे निवेदन
◻️ स्थानिकांना नोकरीत प्राधान्य, स्ट्रीट लाईट सुरू करून सर्विस रोडची दुरुस्तीसह विविध मागण्या
◻️ १ डिसेंबर पासून टोल बंदचा इशारा
संगमनेर LlVE | नाशिक - पुणे महामा.र्गावरील हिवरगाव पावसा येथे टोल सुरू असून या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात होत असून ते तातडीने दुरुस्त करावे स्थानिकांना नोकरीमध्ये प्राधान्य द्यावे स्ट्रीट लाईट सुरू करून सर्विस रोडची दुरुस्ती करावी अशा विविध मागण्यांचे निवेदन संगमनेर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने हिवरगाव पावसात टोल प्रशासनाला देण्यात आले असून ही कामे पूर्ण झाल्यास १ डिसेंबर पासून टोल बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून नाशिक - पुणे महामार्गाचे चौपदरीकरण झाले आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीने झालेल्या या रस्त्याच्या कामाकडे सध्याच्या सरकारचे व टोल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे आमदार बाळासाहेब थोरात व युवा आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यामध्ये रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून ते तातडीने दुरुस्त करावे. टोल ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आवश्यक असून त्यामध्ये स्थानिक तरुणांना नोकरीसाठी प्राधान्य द्यावे. नाशिक पुणे हायवे वरती असलेली स्ट्रीट लाईट बंद असून ती तातडीने सुरू करावी. तसेच सर्विस रोडची दुरुस्ती करून साकुर येथे जाण्यासाठी सर्विस रोड करावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी शहर तसेच तालुक्यातील कॉग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान ही कामे तातडीने दुरुस्त करणे गरजेचे असून १ डिसेंबर २०२३ पर्यंत ही कामे पूर्ण न झाल्यास टोल बंद करण्याचा इशाराही युवक काँग्रेसकडून देण्यात आला आहे.