दिपावली सण हे आनंदाचे पर्व - माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात
◻️ अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्थांमध्ये लक्ष्मीपूजन
◻️ दिपावली प्रकाशातून आनंद निर्माण करणार सण – मा. आ. डॉ. सुधीर तांबे
संगमनेर LlVE | प्रत्येक जण वर्षभर कष्ट करत असतो. धावपळ करत असतो. मात्र दीपावलीच्या काळामध्ये सर्वानी कुटुंबीयांसमवेत मित्रपरिवारासमवेत दिवाळी आनंदाने साजरी करावी. कारण दीपावली हा मोठा सण आहे. हे वर्षभरातील आनंदाचे पर्व असून प्रत्येकाच्या जिवनात चैतन्य व आनंद निर्माण व्हावा अशा शुभेच्छा मा. महसूलमंत्री तथा विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिल्या आहे.
अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्थांमध्ये आमदार थोरात यांच्या उपस्थितीत लक्ष्मीपूजन करण्यात आले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह. साखर कारखान्यात झालेल्या छोटेखाणी कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा बँक, अमृतवाहिनी बँक, राजहंस दुध संघ, शेम्प्रो, हरिश्चंद्र फेडरेशन येथे ही लक्ष्मीपूजन करण्यात आले. कारखाना कार्यस्थळावर विनोद राऊत व स्वप्नाली राऊत यांचा भजन गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी बोलतांना आ. थोरात म्हणाले कि, भारतीय संस्कृतीत दिपोत्सव म्हणून साजरा होणाऱ्या सणात लहान थोर सर्व आनंदाने सहभागी होतात. संगमनेर तालुका हा एक परिवार आहे तालुक्यातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी युवक कर्मचारी बांधव या सर्वांच्या समवेत आपण दरवर्षी आनंदाने दिवाळी साजरा करत असतो. दिवाळी हे आनंदाचे पर्व आहे या काळामध्ये नातेवाईक कुटुंब मित्रपरिवार यांच्या समवेत आनंदाने हा उत्सव साजरा करा कारण धावपळ हा जीवनातील नित्याचाच भाग आहे.
कामगार, शेतकरी, सर्वसामान्य नागरिक यांनी खरेदीसाठी बाजार पेठेत मोठी गदी दिसुन येत असल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. पारंपारिक पध्दतीने दिवाळी साजरा करतांना पर्यावरण रक्षणाची ही काळजी सर्वांनी घ्यावी व सर्वाना आरोग्यदायी जीवन, भरभराटी लाभावी असे आ थोरात यांनी म्हटले आहे.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले तर अमोल दिघे यांनी आभार मानले.
दिपावली प्रकाशातून आनंद निर्माण करणार सण - डॉ. सुधीर तांबे
दिपावली हा प्रकाशातून आनंद निर्माण करणारा सण आहे. भारतीय संस्कृतीत या सणाचे महत्व मोठे असून सर्वांनी एकत्र येवून हा सण साजरा करावा. एकमेकांच्या जिवनात आनंद निर्माण करतांना समृध्द कुटुंबाच्या उभारणीबरोबर समृध्द देशाच्या उभारणीत ही सहभाग द्यावा. ही दिपावली सर्वांना आनंदमय व भरभराटीची जावो. अशा शुभेच्छा मा. आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी यावेळी दिल्या.