समाजामध्ये आरोप करण्यापेक्षा विकास करणाऱ्याच्या पाठीमागे थांबा - खा. सुजय विखे पाटील

संगमनेर Live
0
समाजामध्ये आरोप करण्यापेक्षा विकास करणाऱ्याच्या पाठीमागे थांबा - खा. सुजय विखे पाटील 

◻️ नेप्ती चौकातील खा. विखे व आ. जगताप यांच्या उपस्थित सीना नदी पुलाचे भूमीपूजन समारंभ संपन्न

◻️ अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या पुलाचे काम आज प्रत्यक्षात सुरू

संगमनेर LlVE (अहमदनगर) | आज कल्याण - नगर रोड (अहमदनगर) येथील कल्याण-अहमदनगर-नांदेड राष्ट्रीय महामार्ग ६१, सा. क्र. २१४.१८० मध्ये सिना नदीवर जोडरस्ते व काँक्रीट गटारसह मोठ्या पुलाचा भूमिपूजन समारंभ सीना नदी ब्रीज, नेप्ती नाका, नगर-कल्याण रोड, अहमदनगर येथे खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला.

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या पुलाचे काम आज प्रत्यक्षात सुरू होत असल्याने नागरिकांनी मोठा दिलासा व्यक्त केला आहे. दरम्यान येणाऱ्या दीड वर्षात या पुलाचे काम मार्गी लागेल असे आश्वासन उपस्थित नागरिकांना खासदार सुजय विखेंनी यावेळी दिले. तसेच राजकारण बाजूला ठेऊन जेव्हा विकास साधला जातो या बाबतीतले चित्र गेल्या अनेक वर्षांपासून नगरवासिय पाहत आहेत असे देखील त्यांनी सांगितले. 

यासोबतच आमदार संग्राम जगताप आणि माझ्या हातून अशी अनेकविध कामे मार्गी लागत आहेत. परंतु अनेक लोकांना आम्ही सोबत कुठे असलो की खटकते. परंतु विकासासाठी आम्ही एकत्र काम करत आहोत आणि यापुढेही करत राहू असे उत्तर टीकाकारांना खासदार सुजय विखेंनी दिले. 

तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या पुलाचे काम आज प्रत्यक्षात सुरू होत आहे. यासाठी सुमारे साडे सत्तावीस कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला आहे. याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार देखील मानले. यासोबतच येणाऱ्या दीड वर्षात या पुलाचे काम मार्गी लागेल असे आश्वासन उपस्थित नागरिकांना दिले.

समाजामध्ये काम करत असताना खूप लोक टीका करत असतात, पण जो समाजासाठी काम करत असतो त्याच्यामागे जनता ही ठामपणे उभी असते. त्यामुळे टीका करणाऱ्यांनी विकासकामे न करता केवळ विरोध करत रहावा आम्ही विकासकामे करत राहू असे प्रतिपादन खासदार सुजय विखे पाटील यांनी केले.

नगर-कल्याण रोड, नेप्ती नाका येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप यांचे देखील समयोचित भाषण झाले. 

यासोबतच आमदार आणि खासदार यांचे विकासाचे धोरण एकच आहे. सर्वसमावेशक विकसित अहमदनगर शहर आपल्याला पाहायचे असेल तर स्थानिक प्रतिनिधींनी देखील राजकीय जोडे बाजूला ठेवून विकासकामांसाठी एकत्र यावे असे आवाहन खासदार विखेंनी स्थानिक नेत्यांना केले.

दरम्यान यावेळी उत्तरेत दिवाळी गोड आणि दक्षिणेत दिवाळी कडू असे वक्तव्य करणाऱ्या विरोधकांना देखील खासदार विखे यांनी खडेबोल सुनावले आहेत. गेल्या ३३ वर्षांमध्ये तुमच्याकडे ही पदं होती, त्यावेळी दिवाळी साजरी करून लोकांना साखर का नाही वाटली? बोलणारा एक स्क्रिप्ट लिहिणारा एक आणि वाचणारा एक; अशी सध्या विरोधकांची स्थिती झाली आहे असा उपरोधिक टोला विरोधकांना त्यांनी लगावला आहे. विखे पाटील परिवार पन्नास वर्षांपासून समाजकारणामध्ये सक्रिय आहे. अनेक त्याग करून समाजाची सेवा करण्याचे काम केले आहे आणि यापुढेही करत राहील असे मत देखील खासदार विखेंनी मांडले.

तसेच टीका करणाऱ्यांना त्यांनी सांगितले की, उत्तर नगरमध्ये जशी दिवाळी गोड झाली तशीच दिवाळी दक्षिणमध्ये सुद्धा होईल. कारण यंदा जिल्ह्यात दोन वेळा दिवाळी साजरी होणार आहे. प्रभू श्री राम जेव्हा १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले तेव्हा लोकांनी दिवे लावून त्यांचे स्वागत केले आणि त्यामुळे दिवाळी साजरा झाली. ही पहिली दिवाळी आपण नुकतीच साजरी केली. परंतु यंदा दुसरी दिवाळी ही २२ जानेवारीला होणार आहे. कारण अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न होणार आहे. या निमित्ताने नगर जिल्ह्यात दुसरी दिवाळी साजरी होईल. तेव्हा येणाऱ्या २२ जानेवारीला नगर दक्षिणेची देखील दिवाळी गोड होणार त्याची काळजी तुम्ही करू नये त्यासाठी आम्ही समर्थ आहोत असे उत्तर विरोधकांना खासदार सुजय विखेंनी दिले.

यासोबतच सध्या नगर-कल्याण रोडची देखील गंभीर अवस्था पाहायला मिळत आहे, त्यामुळे येत्या एका महिन्यात आमदार संग्राम जगताप आणि माझ्या माध्यमातून सदर रस्त्यासाठी १६ कोटी रुपये मंजूर करून पुलापासून ते अमरधामपर्यंत पेव्हींग ब्लॉक बसवणार आहोत अशी देखील माहिती खासदार सुजय विखेंनी यावेळी दिली.

या भूमिपूजन प्रसंगी महापौर रोहिणीताई शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, श्याम नळकांडे, नगरसेवक धनंजय जाधव, नगरसेवक पुष्पाताई बोरुडे, नगरसेवक अवितात्या घुले, नगरसेवक अनिल भाऊ बोरुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते, सुभाष लोंढे, प्रकाश भागानगुटे, संजय चोपडा, निखिल वारे, विपुल शेटिया, विनीत पाऊलबुदे, बाळासाहेब पवार, रामअप्पा नळकांडे, शरद गणगे, वैभव वाघ, संदीप दातरंग, दत्ता गाडळकर आदी महायुतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !