आळंदी कडे चाललेल्या वारकऱ्यांच्या दिंडी समवेत चालतायत ‘लव - कुश’
◻️ शिर्डी पासून माऊलींच्या पालखी समवेत ; भाकरी खेरीज केवळ दूधावर करतायत गुजारणा
संगमनेर LIVE | कार्तिकी एकादशी यात्रा आणि संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा उत्सव यावर्षी ५ डिसेंबर ते १२ डिसेंबर दरम्यान आळंदी येथे संपन्न होणार आहे. त्या निमित्ताने राज्यातून लाखो वारकरी हजारो दिंड्यामधून आळंदीच्या दिशेने मजल दर मजल करत चालले आहे. अशीच शिवराई (ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) येथिल एक दिंडी आळंदीच्या दिशेने हरिनामाचा गजर करत चालली असून आश्वी खुर्द (ता. संगमनेर) येथे या दिंडीच्या पुढे चालणारे दोन श्वान सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
९ डिसेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे, तर ११ डिसेंबरला संत ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा आहे. त्या पार्श्वभूमीवर या कालावधीत वारकरी व लाखो भाविक टाळ मृदुंगाचा गजर व हरिनामाच्या जयघोष करत आमच्या दिशेने चालले आहे. अशा वेळी श्री क्षेत्र शनैश्वर मंदिर देवस्थान दत्तवाडी, शिवराई (ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) येथिल एक दिंडी मंगळवार दि. २८ नोव्हेंबर रोजी आळंदीच्या दिशेने निघाली आहे.
“सबका मालिक एक” असे सांगणाऱ्या साईबाबाच्या शिर्डी या पावन भूमीत दिंडी दाखल झाल्यानंतर दोन श्वान या दिंडीच्या अवतीभवती घुटमळत होते. या ठिकाणाहून ही दिंडी पुढे निघाली असती हे दोन्ही श्वान वारकऱ्यांसमवेत चालू लागले. दोन दिवसांच्या प्रवासात या दोन्ही श्वानानी दूध वगळता काहीही घेतले नाही. त्यामुळे वारकऱ्यांच्या बरंच इतरांमध्ये ही या श्वानाबद्दल कुतुहल निर्माण झाले आहे.
दरम्यान शुक्रवारी ही दिंडी आश्वी खुर्द येथील विठ्ठल भक्त संजय गायकवाड यांच्या स्वामी समर्थ उद्योग समुह येथे चहा पाणी पिण्यासाठी थांबली होती. यावेळी याठिकाणाहून जाणाऱ्या येणाऱ्या नागरीकांचे दिंडी समवेत चालणारे श्वान लक्ष वेधून घेत होते.
दोन दिवसांपासून हे दोन श्वान माऊलींच्या पालखी समवेत चालत आहेत. दिंडीतील वारकऱ्यांना त्याचा लळा लागला असून वारकऱ्यांनी त्यांचे “लव - कुश” असे नामकरण केले आहे. विशेष म्हणजे या दोन दिवसांत या श्वानानी भाकरीला तोंड देखिल लावले नाही, केवळ दुधावर त्याची गुजारणा सुरु असणे हा माऊलीचाचं चमत्कार म्हणावा लागेल. असे दिंडी प्रमुख ह.भ.प. सिताराम महाराज मते यांनी म्हटले आहे.