सहकारमहर्षी चषक टि. २० क्रिकेट स्पर्धेची जय्यत तयारी
◻️ संगमनेरकर अनुभवणार १ ते १७ जानेवारी २०२४ दरम्यान क्रिकेटचा थरार
◻️ आयपीएल खेळाडू, रणजी खेळाडू यांसह मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार होणार सहभाग
संगमनेर LIVE | क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर व जयहिंद लोक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सहकारमहर्षी चषक लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेची सुरुवात संगमनेर शहरात १ जानेवारी २०२४ पासून होत आहे. या क्रिकेट थरारासाठी मैदानाची जय्यत तयारी सुरु असून याची पहाणी मा. आमदार डॉ. सुधीर तांबे व आमदार सत्यजित तांबे यांनी केली.
सहकारमहर्षी चषक ही महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठेची व नावाजलेली क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते. उत्तम दर्जाच्या संघाचा सहभाग, आंतरराष्ट्रीय दर्जाचे नियोजन व प्रचंड उत्साही प्रेक्षक ही या स्पर्धेची ठळक वैशिष्ट्ये आहेत. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस २ लाख १ हजार रुपये रुपये आहे.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व आ. सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या स्पर्धेचा प्रत्येक सामना पाहण्यासाठी दरवर्षी किमान १० हजार प्रेक्षकांची उपस्थिती लाभत असते.
२०२३ - २४ हे वर्ष थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची जन्मशताब्दी वर्ष आहे यानिमित्त संगमनेर तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली ही भव्य दिव्य स्पर्धा होत असून या स्पर्धेसाठी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रिडा संकुल सज्ज झाले आहे. उत्कृष्ट नियोजनासह प्रेक्षकांची खास व्यवस्था खेळाडूंची व्यवस्था आदि कामांसह स्पर्धेची तयारी अंतिम टप्यात आली आहे.
१ जानेवारी २०२४ ते १७ जानेवारी २०२४ या दरम्यान होणाऱ्या या सामन्याचे उद्घाटन आ. बाळासाहेब थोरात व आ. डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे व मान्यवरांच्या उपस्थितीत १ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९ वाजता या क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. या स्पर्धेमध्ये विविध आयपीएल खेळाडू व रणजी खेळाडू यांसह मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार यांचा सहभाग हे आकर्षण ठरणार आहे.
दरम्यान या स्पर्धेच्या तयारीची पाहणी आयोजक आ. सत्यजित तांबे व पदाधिकाऱ्यांनी केली. तरी या या क्रिकेटच्या स्पर्धेत जास्तीत - जास्त संघानी सहभाग घ्यावा व या टी ट्वेंटी स्पर्धेचा जास्तीत जास्त क्रीडा प्रेमींनी आनंद घ्यावा असे आवाहन क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर आणि जय हिंद लोक चळवळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.