संगमनेर प्रांत कार्यालयासमोर दुध ओतून किसान सभेचे आंदोलन

संगमनेर Live
0
संगमनेर प्रांत कार्यालयासमोर दुध ओतून किसान सभेचे आंदोलन

◻️ दुधाला किमान ३४ रुपये दर देण्याची मागणी

◻️ किसान सभा व दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आक्रमक 

संगमनेर LIVE | दुधाला किमान ३४ रुपये दर द्यावा या मागणीसाठी किसान सभा व दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयासमोर दुध ओतून तीव्र आंदोलन केले. 

राज्यभर दुधाचे भाव कोसळल्यामुळे व पशुखाद्याचे भाव सातत्याने वाढत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांना अशा अडचणीच्या काळात मदत व्हावी यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा ही रास्त अपेक्षा बाळगून शेतकऱ्यांनी राज्यभर तीव्र आंदोलने केली. आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सरकारने दुधाला किमान ३४  रुपये भाव द्यावा असा शासनादेश काढला. मात्र सरकारचा हा शासनादेश खाजगी व सहकारी दुध संघांनी धुडकावून लावला आहे. सरकारने या पार्श्वभूमीवर तातडीने कारवाई करावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा यासाठी हे आंदोलन करण्यात आले. 

दुधाला किमान ३४  रुपये दर द्यावा, पशुखाद्याचे भाव कमी करावेत, मिल्को मिटर व वजन काट्यांची नियमित तपासणी करावी व दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात या मागण्या यावेळी करण्यात आल्या. संगमनेर तालुक्यातील दुध उत्पादक यावेळी आंदोलनात मोठ्या संखेने सामील झाले होते. 

संगमनेर येथील धनगर गल्ली याठिकाणी असलेल्या किसान सभेच्या कार्यालयात सुरूवातीला शेतकरी जमा झाले. संगमनेर शहरातून मोठा मोर्चा काढत शेतकऱ्यांनी सकाळी ११.३० वाजता प्रांताधिकारी कार्यालयाकडे कूच केले. सरकारचा आणि दुध कंपन्यांचा निषेध करणाऱ्या घोषणा देत हा भव्य मोर्चा शहराच्या मुख्य रस्त्यावरून प्रांताधिकारी कार्यालयावर पोहोचला. प्रांत कार्यालयाच्या दारात दुध ओतून यावेळी आंदोलनाल करण्यात आले.
 
दुधातील दराच्या चढ उतारामुळे निर्माण होणारी अस्थिरता संपविण्यासाठी दुग्धविकास विभागाने दुधाचे खरेदी दर निश्चित करण्यासाठी समिती नेमली होती. खाजगी व सहकारी दुध संघांचे व दुध कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच सरकारी अधिकारी यांचा समावेश असलेल्या समितीने दर तीन महिन्याने दुध खरेदीदर ठरवावेत व दुध संघांनी आणि  कंपन्यांनी यानुसार दर द्यावेत असे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी जाहीर केले होते. 

यानुसार दुधाला ३४  रुपये दर जाहीर करण्यात आला होता. मात्र या दरात रिव्हर्स दराची मेख मारून दुध कंपन्यांनी त्यावेळी दर पाडले. आता तर हा आदेशच  धाब्यावर बसविण्यात आला आहे. ३४ रुपयाऐवजी बेस रेट २७ रुपयांपर्यंत खाली आणण्यात आला आहे. दुध संघ व दुध कंपन्या संगनमत करून हे दर पाडत असून या लुटमारीला लगाम लावण्यासाठी व पशुखाद्याचे दर नियंत्रित करण्यासाठी कायदा करण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी डॉ. अजित नवले यांनी सांगितले. 

३० नोव्हेंबर रोजी अकोले तहसील कार्यालयात दुध ओतले. आज ५ डिसेंबर रोजी संगमनेर प्रांत कार्यालयात दुध ओतून आंदोलन करण्यात आले. सरकारने तरीही दाद दिली नाही तर मंत्रालयात दुध ओतावे लागेल असा इशारा यावेळी किसान सभेचे राज्य सहसचिव सदाशिव साबळे यांनी दिला. मोर्चामध्ये दुध उत्पादकांच्या सोबतच बांधकाम कामगार व  वन जमीन धारकही मोठ्या संख्येने सामील झाले होते. त्यांच्याही मागण्यांचे निवेदन यावेळी प्रांताधिकारी संगमनेर यांना देण्यात आले.  

याप्रसंगी डॉ. अजित नवले, सतीश देशमुख, सदाशिव साबळे, जोतीराम जाधव, महेश नवले, डॉ. मनोज मोरे, नामदेव भांगरे, डॉ. संदीप कडलग, एकनाथ मेंगाळ, रामनाथ वादक, नंदू रोकडे, नंदू गवांदे, ताराचंद विघे, संगीता साळवे आदि उपस्थित होते.


Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !