पिंपरणे येथे एसटी बस झाली पलटी
◻️ दैव बलवत्तर म्हणून सर्व प्रवासी बचावले
◻️ एसटी बस मध्ये ७० च्या आसपास होते प्रवासी
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील कोळेवाडी या ठिकाणी सोमवारी मुक्कामी गेलेली बस पुन्हा मंगळवारी सकाळी खांबा, वरवंडी, शिबलापुर, हंगेवाडी मार्गे संगमनेरला येत असताना पिंपरणे पुलावरून खाली कोसळली असू सुदैवाने कोणताही अनर्थ घडला नाही. यामध्ये प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
कोळेवाडी येथे एसटी महामंडळाची बस (एम एच ०७ सी ९१४६) मुक्कामी गेली होती. शिबलापूर मार्गे प्रवाशी घेत येत असताना मंगळवारी (दि. २६) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास पिंपरणे येथे आल्यावर बसचा एक्सल तुटला आणि बस पुलावरून खाली पलटी झाली.
दैव बलवत्तर म्हणून बस मधील चालक मनोहर गागरे आणि वाहक एस. एस. बर्डे हे दोघे किरकोळ जखमी झाले. एसटी बस कोसळली त्यावेळेस एसटी बस मध्ये ७० च्या आसपास प्रवासी प्रवास करत होते. ४७ प्रवासी तिकीटधारी पासवाले १५ ते २० होते. सर्व किरकोळ जखमी असून जीवित हानी झालेली नसल्याची माहिती वाहक एस. एस. बर्डे यांनी दिली आहे.
यावेळी संगमनेर तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली व जखमीची चौकशी केली. जखमींना पुढील उपचारासाठी संगमनेर येथे हलविण्यात आले.
दरम्यान अपघातग्रस्तांना गावातील तरुण, पोलीस पाटील विनोद साळवे, सरपंच नारायण मरभळ, मंज्याबापू साळवे, संदीप साळवे, ऋषी साळवे, संजय बागुल, राजहंस संघाचे संचालक रवींद्र रोहम, गोकुळ काळे, निलेश बागुल, वाहक अरुण वाकचौरे व ग्रामस्थांनी मदत केली.