समानता देणारी भारतीय राज्यघटना जगात सर्वश्रेष्ठ - माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात
◻️ समता व मानवतेच्या मूलभूत तत्वांना धक्का लागू देऊ नका
◻️ अमृत उद्योग समूहात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
संगमनेर LIVE | समान संधी, मताचा अधिकार आणि समानता देणारी भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वश्रेष्ठ राज्यघटना असून या राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वांना धक्का लागता कामा नये यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहावे असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर अमृत उद्योग समूहाच्या सामूहिक ध्वजावंदन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, व्हा. चेअरमन संतोष हासे, राम हरी कातोरे, रोहिदास पवार, डॉ. तुषार दिघे, संभाजी वाकचौरे, सुभाष सांगळे, निखिल पापडेजा, नितीन अभंग, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, किरण कानवडे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शुभेच्छा देताना आमदार थोरात म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य दिले. १९४२ ची चळवळ ही ऐतिहासिक चळवळ होती. या चळवळीमध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सक्रिय सहभाग घेतला. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांना कारावास झाला. देश स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सर्वांना समानता देणारी राज्यघटना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिली. मानवता धर्म जपणारी, समान संधी, मताचा अधिकार आणि समानता देणारी भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वश्रेष्ठ राज्य घटना आहे.
देशाने मागील ७५ वर्षात मोठी प्रगती केली आहे. अनेक संकटे आली. अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली. मात्र त्यात देश स्वयंपूर्ण झाला. चीन, पाकिस्तान युद्धामध्ये यश मिळवले . राज्यघटनेच्या मार्गदर्शनातून देशाने विविध क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. महाराष्ट्राने स्व. यशवंतराव चव्हाण यांची परंपरा राखत अत्यंत यशस्वीपणे वाटचाल केली आहे. शेती, कारखाने, रोजगार वाढले आहेत. सामान्य माणसाचे जीवनमान चांगले झाले आहे.
संगमनेर तालुका हा अत्यंत दुष्काळी व प्रतिकूल स्थितीत होता. १९६८ मध्ये कारखाना स्थापन झाला आणि तेथून बदलाला सुरुवात झाली. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अनेक सहकारी संस्था स्थापन झाल्या. आज या सर्व सहकारी संस्था अत्यंत चांगल्या काम करत आहेत. राज्यसह देशभरातून विविध मान्यवर संगमनेरच्या सहकार पाहण्यासाठी येत आहेत.
मागील काळात आपण निळवंडे धरण पूर्ण केले. कालव्यांचा प्रश्न मार्गी लावला. त्यामुळे निळवंडे चे पाणी आता शेतात आले आहे. हा मोठा अमुलाग्र बदल झाला आहे. समृद्धी निर्माण होण्यामध्ये या धरणाच्या पाण्याचा मोठा वाटा असणार आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेतील बदल होणार आहे. ही प्रगती सुरू जरी असली तरी अडथळे आणण्याचे काम काही लोक करत आहेत. तरीही त्यावर मात करून संगमनेर तालुक्याच्या विकासाची घोडदौड कायम आहे.भारतीय स्वातंत्र्यात योगदान दिलेल्या सर्व महापुरुषांचे स्मरण आणि राज्यघटनेची तत्व जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी कारखाना व विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्तबद्ध संचालन करून मानवंदना दिली.
दरम्यान या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ यांनी केले
शिस्तबद्ध परेड मधून मानवंदना..
कारखाना कार्यस्थळावर सुरक्षा विभाग, अमृतवाहिनी कॉलेज, मॉडेल स्कूल, इंटरनॅशनल स्कूल, विद्याभवन या विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने परेड करून आमदार बाळासाहेब थोरात यांना मानवंदना दिली. यावेळी परेडची पाहणी ही आमदार थोरात यांनी केली. अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज, दूध संघ, अमृतवाहिनी बँक, डेंटल कॉलेज, सह्याद्री कॉलेज या ठिकाणीही ध्वजवंदन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.