सामाजिक सुरक्षेचे योजनारुपी कवच शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन प्रयत्नशिल

संगमनेर Live
0
सामाजिक सुरक्षेचे योजनारुपी कवच शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन प्रयत्नशिल

◻️ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रतिपादन

◻️ ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण


संगमनेर LIVE (अहमदनगर) | देशाच्या प्रगतीचा रथ सर्वसामान्य व्यक्तींच्या योगदानामुळेच पुढे जात आहे. समाजातील शेवटच्या घटकाचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी सामाजिक सुरक्षेचे योजनारुपी कवच तळागाळातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनामार्फत यशस्वी प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी जनतेला उद्देशून शुभेच्छा संदेश देताना ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सलीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकचे आयुक्त डॉ. पंकज जावळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आज विविध क्षेत्रात प्रगती करत आहे. ग्रामीण व शहरी विषमता दुर करत एक विकसनशील राष्ट्र म्हणून भारत देशाची प्रतिमा जगात उंचावत आहे. काळानुरूप देशाच्या विकास प्रक्रियेची गती वाढत असताना २०४७ मधील विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रगतीचे वेगवेगळे टप्पे आपण साध्य करत आहोत. भारत देश जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश बनविण्यासाठी आपल्या सर्वांच्या प्रयत्नांची आणि योगदानाची गरज असल्याचेही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

देशाच्या विकासाचे नवे स्वप्न प्रत्यक्ष साकार करताना देशातील युवा पिढीला केंद्रीभूत मानूनच निर्णय प्रक्रिया होत असल्याचे आपण पहात आहोत. युवशक्तीच्या उर्जेला विधायक आणि रचनात्मक दिशेने पुढे नेण्याची गरज असल्याचेही पालकमंत्री विखे पाटील यावेळी म्हणाले.

लोकसहभागातून विकासाचे व्यवस्थापन करण्याचा संकल्प करून प्रत्येक गाव आणि शहर सुविधांनी परिपूर्ण करण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला, विद्यार्थी यांच्या प्रश्नांना प्राधान्य योजनांची गतीने अंमलबजावणी करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

राज्य शासनाने एक रुपयात सुरू केलेली पीकविमा योजना, केंद्र व राज्य शासनाच्या भागीदारीतून सुरू असलेले जलजीवन मिशन, आयुष्यमान भारत योजना, आनंदाचा शिधा उपक्रम सामाजिक बांधिलकीने राबविण्यात येत असून दूध उत्पादकांना पाच रुपये अनुदान देण्याचा तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून ११ हजार ६७३ शेतकऱ्यांना एक कोटी रुपयांच्या चारापीक बियाण्यांचे वाटप करण्यात येऊन १ लक्ष ८५ हजार मे. टन चारा उत्पादनाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असल्याचेही पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

शासन आपल्या दारी आणि विकसित भारत संकल्प यात्रा हे उपक्रम शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी उपयुक्त ठरले असून यातून शासनाच्या योजना गावागावात पोहोचून नागरिकांना याचा लाभ मिळाला असल्याचेही पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

युवकांच्या रोजगाराच्यादृष्टीने अहमदनगर व शिर्डी येथे औद्योगिक वसाहत उभारणीसाठी जागा हस्तांतरित करण्यात आली आहे. या वसाहती रोजगार उपलब्धतेसाठी महत्त्वपूर्ण ठरतील असा विश्वासही पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

कौशल्यावर आधारित शिक्षणाला प्राधान्य देत उद्योग क्षेत्राला आवश्यक असलेले मनुष्यबळ निर्माणासाठी कौशल्य विकासाचा विशेष कार्यक्रम जिल्ह्यात हाती घेण्यात आला आहे. याद्वारे प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्धतेबाबत युवकांना मार्गदर्शन केले जाणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

जिल्ह्यातील तीर्थक्षेत्राचा विकास हा प्राधान्यक्रम ठरला असून या भागाचा विकास झाला तर परिसरातील बाजारपेठ विकसित होण्यास मोठी मदत होणार आहे. यासाठी ६५० कोटी रुपयांचा जिल्हा पर्यटन आराखडा, ९५ कोटी रुपयांचा किल्ला संवर्धन आराखडा, २५ कोटी रुपयांचा क्रीडा विकास आराखडा तसेच नेवासा येथे ज्ञानेश्वर सृष्टी निर्माण करण्यासाठी विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. विकासातून तयार होणारी व्यवस्था रोजगार उपलब्धतेचा शाश्वत आधार ठरेल असेही पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

ध्वजदिन निधी संकलनाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्यासागर कोरडे तसेच मुंबई-पुणे मॅरॉथॉन स्पर्धेत यशस्वी कामगिरी केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांचा पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी शहीद जवानांच्या वीरपत्नी, कुटूंबियांना मदतीचा धनादेश, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा पारितोषिक वितरण,महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमाच्या जिल्हास्तरीय विजेत्यांचा सन्मान, महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रुग्णालयांचा सन्मानही पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनींनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरणीकरण केले. तसेच पोलीस विभागामार्फत रेस्क्यु ऑपरेशनचे प्रात्यक्षिकही यावेळी सादर करण्यात आले.

तत्पूर्वी पालकमंत्र्यांनी परेडचे निरीक्षण केले. परेडमध्ये पोलीस दल, महिला पोलीस दल, बँडपथक, अग्निशामक दल, एनसीसी, आरएसपी, स्काऊट गाईड आदींनी सहभाग घेतला.

यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छाही दिल्या.

दरम्यान या कार्यक्रमास पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांच्यासह शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !