सादतपूर शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षाचा चिमुकला ठार
◻️ वनविभागासह पोलीसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल
संगमनेर LIVE | राहाता तालुक्यातील लोणी येथील बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्याची घटना ताजी असतानाचं सादतपूर (ता. संगमनेर) शिवारातील गोरे वस्तीवरील चार ते ५ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला करुन ठार केल्याची घटना गुरुवारी (दि. २५) दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे.
सादतपूर येथिल हर्षल राहुल गोरे (वय - ४/५) असे बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या मुलाचे नाव आहे. मयत हर्षल गोरे व साई सर्जेराव गोरे हे गुरुवारी दुपारी ४.३० वाजण्याचा सुमारास चुलत आजोबा जालिंदर गोवींद गोरे यांच्या वस्तीवरुन दोनशे फुटावर असलेल्या आपल्या घरी जात होते. यावेळी मका पिकात भक्ष्याच्या शोधात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने हर्षल गोरे वर हल्ला करुन त्याला मकाच्या पिकात उचलून नेले. यावेळी घाबरलेल्या साई गोरे ने आरडाओरड केल्यानंतर त्याठिकाणी आलेल्या नागरिकांनी मका पिकात हर्षलचा शोध घेण्यास सुरुवात केली असता, तो गंभीर रित्या जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तेथे डाॅक्टरांनी मृत घोषित केले.
या घटनेची माहीती पोलीस पाटील सुनील आप्पासाहेब मगर यांनी वनविभाग तसेच आश्वी पोलीस स्टेशन दिली या नर भक्षक बिबट्याचा बंदोबस्त वनविभागाने त्वरीत करावा अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. सादतपूर सह सर्वत्र शोकाकुल वातावरण आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच वनविभाग व आश्वी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी याठिकाणी तीन पिंजरे लावण्यात आले आहे.
बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी घटनास्थळी पुणे, जुन्नर व नाशिक येथील वनविभागाचे पथक रात्री किंवा सकाळपर्यंत दाखल होईल. त्यामुळे घटनास्थळासह शिवा लगतच्या गावातील नागरीकानी सावध राहावे. असे आवाहन संगमनेर भाग २ चे वनरक्षक साळु सोनवणे यांनी केले आहे.