सर्व परीक्षा ह्या लोकसेवा आयोगा मार्फतच घ्याव्यात - माजी आ. डॉ. सुधीर तांबे
◻️ भ्रष्टाचार मुक्त व पारदर्शक नोकर भरतीसाठी परीक्षा लोकसेवा आयोगा मार्फत होणे गरजेचे
संगमनेर LIVE | राज्यामध्ये विविध प्रकारच्या प्रशासकीय
जागांसाठी परीक्षा घेतल्या जातात. या नोकर भरतीसाठी वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत भरती केली जात असून यामधून अनेकदा गैरप्रकारासह भ्रष्टाचार होत आहे. हे अत्यंत दुर्दैवी असून योग्य व्यक्तींची निवड होण्यासाठी अत्यंत पारदर्शक व गुणवत्तेने परीक्षा होणे गरजेचे आहे. म्हणून नोकर भरतीच्या सर्व परीक्षा ह्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फतच घ्याव्यात अशी आग्रही मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी सरकारकडे केली आहे.
शासनाकडून होत असल्या विविध परीक्षा भरती बाबत सरकारकडे मागणी करताना मा. आमदार डॉ. तांबे म्हणाले की, शासनाच्या सध्याच्या धोरणानुसार वेगवेगळ्या पदांसाठी होणाऱ्या नोकर भरती परीक्षांचे काम हे विविध कंपन्यांना दिले जाते. या कंपन्या खाजगी आहेत आणि वेळोवेळी हे सिद्ध झाले की त्याच्यामध्ये पारदर्शकतेबद्दल मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. यामधून अनेक गैरप्रकार व मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे तलाठी भरती सह मागील अनेक परीक्षा रद्द ही कराव्या लागल्या आहेत.
अनेक शासकीय जागा रिक्त असून सुद्धा शासन या जागांची भरती करत नाही. अनेक विभागांमध्ये कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनुसार भरती केली जात आहे. सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये सर्व युवक अत्यंत अस्वस्थ असून त्यांची अवस्था खूपच बिकट आहे. खरं म्हणजे सरकारकडून तरुणांना खेळवल्यासारखी अवस्था केली जात आहे. सध्या ज्या पद्धतीने या परीक्षा घेतल्या जातात. त्या परीक्षेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोठ्या भ्रष्टाचार होत असतो. हे आता उघड झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये शासनाने कॉन्ट्रॅक्ट पद्धत व कंपनीच्या द्वारे भरती करण्याचा आग्रह करावा हा मोठा प्रश्न आहे.
हे सर्व रोखण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग पद्धती अत्यंत उपयुक्त आहे. या परीक्षा पद्धतीवर अजूनही लोकांचा विश्वास आहे. ती सिस्टीम अधिक सुदृढ करावी आणि त्यांच्या माध्यमातून या सर्व परीक्षा घेतल्या जाव्यात. याचबरोबर परीक्षांचे प्रमाण सुद्धा थोडं कमी केलं पाहिजे. त्यामध्ये वेगवेगळे गट तयार करून युवकांना सोयीस्कर अशी परीक्षांची विभागणी केली पाहिजे याकरता परीक्षा मूल्य ही अत्यंत कमी असले पाहिजे.
कुठल्याही परिस्थितीत शासनाने आता सर्व नोकर भरतीच्या परीक्षा या पारदर्शी व गुणवत्तेने होण्याकरता महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फतच घ्याव्यात अशी आमची आग्रही मागणी आहे.
दरम्यान खाजगी कंपन्यांद्वारे वेगवेगळ्या परीक्षा, वाढीव शुल्क होणारे भ्रष्टाचार यातून निर्माण होणारी गोंधळाची परिस्थिती हे तरुणांची मानसिकता बिघडवणारी असून याविरुद्ध राज्यातील तरुण आवाज उठवतील आणि संघर्षाची स्थिती निर्माण होईल व याची जबाबदारी शासनावर असेल असेही डॉ. सुधीर तांबे यांनी म्हटले आहे.