अमृतवाहिनी पॉलिटेक्निकच्या १५१ विद्यार्थ्यानी केले रक्तदान
◻️ सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी निमित्त उपक्रम
संगमनेर LIVE | सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने अमृतवाहिनी पॉलिटेक्निक मधील १५१ विद्यार्थ्यानी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून एक आदर्श निर्माण केला आहे.
अर्पण रक्तपेढी व अमृतवाहिनी पॉलिटेक्निक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रक्तदान शिबिरात १५१ विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. यावेळी संस्थेच्या विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य प्रा. व्ही. बी. धुमाळ, इंजिनीरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश, अकॅडमी डायरेक्टर डॉ. जे. बी. गुरव, उपप्राचार्य प्रा. जी. बी. काळे, विभाग प्रमुख प्रा. मिलिंद इंगोले, अक्षय वर्पे, ईश्वर फापाळे आदींसह सर्व विभाग प्रमुख शिक्षक उपस्थित होते.
यावेळी बोलताना सौ. देशमुख म्हणाल्या की, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या अमृतवाहिनी तंत्रनिकेतनने उच्च गुणवत्तेसह उत्कृष्ट निकाल व दर्जेदार शिक्षणाची परंपरा कायम राखली आहे. यामुळे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळी अनेक कंपन्यांनी या महाविद्यालयाची टायप केले असून विद्यार्थ्यांना थेट नोकऱ्या मिळाल्या आहेत. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून मानवाने खूप प्रगती केली परंतु अद्यापही रक्त बनवता आले नाही. आपल्या रक्तामुळे कोणाचे तरी प्राण वाचत असून तरुणांनी रक्तदान करावे असे आवाहन ही त्यांनी केले.
प्राचार्य प्रा. धुमाळ म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात व माजी आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी पॉलिटेक्निक गौरवास्पद वाटचाल केली असून सातत्याने विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. दरवर्षी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान केले जात असून यावर्षीही विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभाग घेतला आहे.
दरम्यान या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रा. मिलिंद इंगोले, ईश्वर फापाळे व अक्षय वर्पे यांनी विशेष परिश्रम घेतले.