निळवंडे उजव्या कालव्यांवरील लाभक्षेत्राला पाणी देण्याचा महायुती सरकारचा निर्णय
◻️ संगमनेर, अकोले व राहुरी तालुक्यातील २० हजार ३९५ हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली
◻️ ६९ गावातील लाखो शेतकऱ्यांना मिळणार लाभ
संगमनेर LIVE | निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्या प्रमाणेच उजव्या कालव्यांवरील लाभक्षेत्रालाही पाणी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतल्याने अकोल, संगमनेर आणि राहुरी या तीन तालुक्यातील सुमारे ६९ गावांमधील २० हजार ३९५ हेक्टर क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला असून, वर्षानुवर्षे पाण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या या गावांना आता पाण्याचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गेली अनेक वर्षे निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील उजव्या कालव्याचे कामेही रखडली होती. यासाठी बहुतांश: वेळा शासन स्तरावर पाठपुरावा करुन, या उजव्या कालव्याच्या कामालाही निधी मिळावा यासाठी प्रयत्न होत होते. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जमीनी अधिग्रहीत होवूनही त्यांना मोबदला मिळालेला नव्हता. संगमनेर तालुक्यातील ३७ गावांची संख्या उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात आहे. या शेतकऱ्यांना जमीनीचा मोबदला मिळावा म्हणूनही अनेक दिवस वाट पाहावी लागली.
महसूल तथा पालकमंत्री मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे आश्वी गटातील अधिग्रहीत झालेल्या जमीनींपोटी शेतकऱ्यांना आर्थिक मोबदलाही मिळू शकला. धरण पुर्ण झाल्यानंतर आता पाण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध व्हावे म्हणून, महायुती सरकारने कालव्यांच्या कामाला गती दिली. डाव्या कालव्या प्रमाणेच उजव्या कालव्यालाही पाणी सोडण्याची चाचणी सुरु झाल्याने वर्षानुवर्षे प्रतिक्षेत असलेल्या अकोले, संगमनेर आणि राहुरी तालुक्यातील सुमारे ६९ गावे आता या पाण्याचा लाभ घेवू शकणार आहेत.
निळवंडे धरणाच्या कामाला खरी गती मिळाली ती २०१४ साली. राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारमुळे. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह धरुन ना. विखे पाटील यांनी धरणाच्या मुखापाशी कालव्यांची कामे सुरु करण्याची विनंती केली होती. यासाठी जेष्ठनेते मधुकरराव पिचड यांनीही सकारात्मक भूमिका घेतल्याने निळवंडे कालव्यांच्या कामातील सर्व अडथळे दुर झाले.
डाव्या कालव्याची पाणी चाचणी यशस्वी झाल्यानंतर पहिले आवर्तनही शेवटच्या गावापर्यंत पोहोचले. आता उजव्या कालव्याला पाणी देण्याची ग्वाही ना. विखे पाटील यांच्यामुळे पुर्णत्वास गेल्याने उजव्या कालव्यावरील शेतकऱृयांनाही मोठा दिलासा मिळणार असून, ही गावेही आता विकासाच्या प्रक्रीयेत समाविष्ठ होतील.
दरम्यान उजव्या कालव्यावरील काही गावे ही वर्षानुवर्षे पाण्यापासून वंचित राहीली होती. या सर्वच गावांना आता पाण्याच्या प्रथम चाचणी नंतर यापुढील सर्वच आवर्तनांचा लाभही मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.