माकप अकोलेतील राजकारणात समर्थ पर्याय देईल - डॉ. अशोक ढवळे

संगमनेर Live
0
माकप अकोलेतील राजकारणात समर्थ पर्याय देईल - डॉ. अशोक ढवळे

◻️ अकोले येथे माकपचे दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण व अभ्यास शिबिर

संगमनेर LIVE (अकोले) | देशभर सध्या राजकारणामध्ये संधीसाधू जातीय व धर्मांध शक्तींनी धुडगूस घातला असताना सुद्धा डावे, धर्मनिरपेक्ष पक्ष, कार्यकर्ते व संघटना तत्वनिष्ठ राजकारणाची पताका उंच फडकवत ठेवून आहेत. अकोले विधानसभा मतदारसंघांमध्ये सुद्धा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष गावोगाव विस्तारत आहे. श्रमिकांचे निर्णायक लढे, संघटन बांधणी व कार्यकर्त्यांच्या अपार मेहनतीच्या माध्यमातून माकप अकोलेत पुढे येत आहे असा विश्वास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य कॉ. डॉ. अशोक ढवळे यांनी व्यक्त केला आहे. 

अकोले येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने दोन दिवसाचे कार्यकर्ता प्रशिक्षण व अभ्यास शिबिर आयोजित करण्यात आले होते. अभ्यास शिबिराच्या दुसऱ्या दिवशी मार्क्सवादाची तोंड ओळख व सद्यकालीन राजकीय आव्हाने या विषयावर व्याख्यान देत असताना डॉ. अशोक ढवळे म्हणाले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहुरी, पारनेर यासह आठ तालुक्यातील २०५ कार्यकर्त्याचे प्रशिक्षण शिबिर अकोले येथे संपन्न झाले. या शिबिरामध्ये अकोले, संगमनेर, राहुरी व पारनेर तालुक्यातील शेतकरी कार्यकर्ते  व आठ तालुक्यातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे नेते व कार्यकर्ते आशा कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, बांधकाम कामगार या संघटनेचे नेते प्रशिक्षण शिबिरासाठी उपस्थित होते. शिबिराच्या पहिल्या दिवशी संघटना बांधणी कला व कौशल्य या विषयावर  स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे माजी राज्य सचिव डॉ. महारुद्र डाके यांनी विषय मांडणी केली. 

पहिल्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रामध्ये जात, धर्म व अस्मितेचे राजकारण या विषयावर अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉ. अजित नवले यांनी विषय मांडणी केली. प्रशिक्षण व अभ्यास शिबिराच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण दिवसभर डॉ. अशोक ढवळे यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. 

शिबिराच्या पहिल्या दिवशी रात्री जय भीम हा आदिवासी अत्याचार व अन्यायाला विरोध करणारी कथा सांगणारा चित्रपट कार्यकर्त्यांना दाखवण्यात आला. ललित छल्लारे यांनी या कामी सहकार्य केले. प्रशिक्षण व अभ्यास शिबिराच्या निमित्ताने मार्क्सवादाची तोंड ओळख हे गोविंद पानसरे लिखित पुस्तक व वारली आदिवासींचा क्रांतिकारक उठाव हे कॉ. डॉ. अशोक ढवळे लिखित पुस्तक शिबिरार्थींना वितरित करण्यात आले. 

अकोले विधानसभा मतदारसंघांमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष गेली २४ वर्ष तळागाळापर्यंत अत्यंत चिकाटीने काम करत आहे. शेतकरी कामगार कर्मचाऱ्यांचे प्रश्न आंदोलनाच्या माध्यमातून निर्णायक पातळीवर सोडवण्यामध्ये माकपला सातत्याने यश आले आहे. अनेक ग्रामपंचायतींमध्ये लोकनियुक्त सरपंच व सदस्यांच्या माध्यमातून माकपने गेल्या चार वर्षांमध्ये मोठा हस्तक्षेप केला आहे. २०१९ च्या निवडणुकीमध्ये एकास एकच्या प्रक्रियेत योगदान देत सत्तांतरामध्ये सुद्धा माकपचे मोठे योगदान राहिले आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष येत्या काळात संधीसाधू, जातीय व धर्मांध राजकारणाला वैचारिक व तत्त्वनिष्ठ पर्याय देत समोर येईल आणि श्रमिक केंद्री राजकारण अधिक मजबूत करेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. 

दरम्यान शिबिराच्या यशस्वीतेसाठी  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव व अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक कॉम्रेड सदाशिव साबळे, किसान सभेचे नेते नामदेव भांगरे, ज्ञानेश्वर काकड, डी. वाय. एफ. आय. युवक संघटनेचे नेते व समशेरपुर गावचे लोकनियुक्त सरपंच एकनाथ मेंगाळ, सिटू चे नेते गणेश ताजणे, संगीता साळवे, निर्मला मांगे, नंदा म्हसे, सुमन वीरनक, तुळशीराम कातोरे, रंजना पराड, राजाराम गंभीरे आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !