वंचित बहुजन आघाडीसोबत ठाकरे आणि पवारांची चर्चा सुरु - रमेश चेन्नीथला

संगमनेर Live
0
वंचित बहुजन आघाडीसोबत ठाकरे आणि पवारांची चर्चा सुरु - रमेश चेन्नीथला

◻️ प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पवित्र कार्यक्रमातही पंतप्रधान मोदींची राजकीय भाषणबाजी

◻️ छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे, त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही - नाना पटोले

◻️ प्रदेश काँग्रेसची पश्चिम विभागातील जिल्हानिहाय आढावा बैठक पुण्यात संपन्न

संगमनेर LIVE (पुणे) | लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असून काँग्रेस पक्ष या निवडणुकीसाठी तयार आहे. ब्लॉक स्तरापासून पक्ष संघटनेच्या तयारीचा आढावा घेतला जात आहे. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याची काँग्रेसची इच्छा असून उद्धवजी ठाकरे आणि शरद पवारजी त्यांच्यासोबत चर्चा करत आहेत. महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व जागा महाविकास आघाडीने एकत्र लढण्यावर एकमत झाले आहे. जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याबाबत निर्णय होईल, अशी माहिती प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे.

प्रदेश काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्र विभागातील जिल्हानिहाय आढावा बैठक प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पार पडली. यावेळी विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी आशिष दुवा, सोनल पटेल, आमदार रविंद्र धंगेकर, माजी मंत्री रमेश बागवे, पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष, प्रशासन व संघटन नाना गावंडे, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, माजी आमदार दीप्ती चवधरी, कमल व्यवहारे, प्रदेश प्रवक्ते अनंत गाडगीळ, गोपाल तिवारी, संजय बालगुडे, प्रदेश सचिव रामविजय बुरुंगले आदी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेला संबोधित करताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, भारतीय जनता पक्ष धर्माच्या नावाचा वापर राजकीय फायद्यासाठी करत आहे. भारत देशाला महान परंपरा आहे ती तोडण्याचे काम भाजपा करत आहेत. भगवान श्रीरामांना सर्व लोक मानतात, प्रभू राम हे सर्वांचे आहेत पण भाजपा व पंतप्रधन नरेंद्र मोदी हे भगवान रामाचा वापर निवडणुकीसाठी करत आहेत. अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला पण त्यावेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय भाषणबाजी केली. 

अयोध्येतील बांधकाम पूर्ण न झालेल्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला शंकराचार्यांचा विरोध होता पण त्यांच्याकडेही भाजपा व मोदींनी दुर्लक्ष केले. गुजरातमधील ऐतिहासिक सोमनाथ मंदिराचाही जिर्णोध्दार करण्यात आला पण त्याचा कोणी राजकीय फायदा उठवला नाही. मंदिर, मशिद, गुरुद्वारामध्ये जाण्यापासून कोणालाही रोखले जात नाही. सर्व लोकांना त्यांच्या धर्मानुसार स्वातंत्र्य आहे पण खासदार राहुल गांधी यांना आसाम मध्ये मंदिरात जाण्यापासून भाजपा सरकारने रोखले हे दुर्दैवी असून ही आपली परंपरा नाही. राहुल गांधींना मंदिर भेटीचे आमंत्रण होते पण त्यांना जाऊ दिले नाही. भारत जोडो न्याय यात्रेवरही आसाममध्ये भाजपाच्या गुंडांनी हल्ले केले या घटनांचा काँग्रेस पक्ष निषेध करत आहे.

पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे चर्चा करत आहेत. सर्वांना बरोबर घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. जागा वाटपाचा निर्णयही लवकरच जाहीर होईल, असेही चेन्नीथला यांनी सांगितले.

यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तोडफोड करुन मांडण्याचा प्रयत्न अनेकदा झाला आहे व आजही केला जात आहे.  छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते त्यांची तुलना नरेंद्र मोदी यांच्याशी कधीच होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते व राहतील आणि ते आमचे दैवत आहेत व त्यांचे स्थान अबाधितच राहिल. 

भारतीय जनता पक्षाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही. देवेंद्र फडणवीस यांनी एका महिन्यात आरक्षण देतो असे जाहीरपमे सांगितले होते, आज त्यांच्याकडे पाशवी बहुमत आहे तर मग मराठा समाजाला फडणवीस आरक्षण का देत नाहीत? मनोज जरांगे पाटील यांचा प्रश्न भाजपा सरकारने तातडीने सोडवला पाहिजे पण सरकार मुद्दामपणे पाप करत आहे. मराठा समाज व ओबीसी समाजात फूट पाडण्याचे काम भाजपा करत आहेत असेही नाना पटोले म्हणाले.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !