छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करा
◻️ निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांचे आवाहन
संगमनेर LIVE (अहमदनगर) | येत्या १९ फेब्रुवारी, २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार असुन या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.
या दिनाचे औचित्य साधुन थोरपुरुषांचे पुतळे, स्मारके असलेल्या परिसराची पहाणी करुन आदल्या दिवशी त्या ठिकाणी रंगरंगोटी, साफसफाई तसेच सुशोभिकरण करण्यात यावे. तसेच दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्र राज्याच्या राज्यगीताचे गायन करुन सर्व वरिष्ठ अधिकारी व कार्यालय प्रमुखांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावे.
या कार्यक्रमानंतर छोटेखानी सांस्कृतिक समारंभाचे आयोजन करण्यात यावे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाबाबत सर्व बाबींचे काटेकोरपणे पालन करुन शासनाने दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करण्याच्या सुचनाही परिपत्रकान्वये सर्व शासकीय कार्यालयांना दिल्या आहेत.