योजनांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी ‘गाव चलो’ अभियान सुरु - सौ. कांचनताई मांढरे
◻️ निळवंडे येथे महिलासह बचत गटांच्या चळवळीतील महिलांशी साधला संवाद
◻️ भविष्यात विद्यार्थीनींना मोफत शिक्षणाची दिली ग्वाही
संगमनेर LIVE | केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून महिलांकरीता विविध योजनांची अंमलबजावणी सुरु आहे. बचत गटांच्या चळवळीला प्रोत्साहन दिले जात असून, या योजनांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी गाव चलो अभियान सुरु असून, प्रत्येक महिला पदाधिकाऱ्याने नागरीकांकडे जावून योजनांबाबत माहीती द्यावी असे आवाहन भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. कांचनताई मांढरे यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे गाव चलो अभियानाच्या माध्यमातून सौ. मांढरे यांनी महिला तसेच बचत गटांच्या चळवळीतील महिलांशी संवाद साधून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची माहीती दिली. तालुका अध्यक्षा सौ. कविता पाटील, उत्तर नगर जिल्ह्याच्या कोषाध्यक्षा सौ. सुनिता मोरे, निळवंडेच्या सरपंच सौ. शशिकला पवार, जनसेवा फौंडेशनच्या समन्वयक सौ. रुपाली लोंढे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आपल्या भाषणात सौ. मांढरे म्हणाल्या की, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गाव चलो अभियान सुरु आहे. या अभियानाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारने सुरु केलेल्या योजनांचा जागर करायचा आहे. यासाठी महिलांनी वाढी वस्त्यांवर जावून लोकांपर्यंत सरकारचे काम पोहोचवावे असे आवाहन त्यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने महिलांकरीता विविध योजना सुरु केल्या आहेत. महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. या बरोबरीनेच महिला बचत गटांच्या चळवळीला पाठबळ देण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. योजनांच्या माध्यमातून शेतकरी, विद्यार्थी, कामगार यांना सुरक्षा कवच देवून सर्वच समाज घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य सरकार महिलांना बस प्रवासामध्ये ५० टक्के सुट दिली. जेष्ठ नागरीकांनाही मोफत प्रवास सुरु आहे. आनंदाचा शिधा प्रत्येक सणासाठी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतला असून, येणाऱ्या काळात विद्यार्थींनींना मोफत शिक्षण देण्याच्या निर्णयाची सुध्दा अंमलबजावणी होईल अशी ग्वाही दिली. यासर्व योजना भाजपाच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पाहोचविण्याचे काम महिलांनी करावे असे त्यांनी सुचित केले. याप्रसंगी सौ. रुपाली लोंढे, सरपंच सौ. शशिकला पवार यांची भाषणे झाली.