विकासाचा मंत्र घेवून येणाऱ्यांना पाठबळ द्या - ना. विखे पाटील

संगमनेर Live
0
विकासाचा मंत्र घेवून येणाऱ्यांना पाठबळ द्या - ना. विखे पाटील 

◻️ खांबा येथे ना. विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत विविध विकास कामांचा शुभारंभ

◻️ सरपंच रवींद्र दातीर यांच्‍यासह युवक कार्यकर्त्‍याचा भाजपामध्‍ये प्रवेश

संगमनेर LIVE | मंत्रीपद असूनही तालुक्‍यात रोजगाराची कोणतीही साधनं निर्माण करता आली नाहीत, लोकांची कामे करण्‍यात तालुक्‍याच्‍या नेत्‍यांना कोणतेही स्‍वारस्‍य नाही, हेलपाटे मारायला लावण्‍यातच त्‍यांना स्‍वारस्‍य वाटते. तालुक्‍यातील जनतेने आता पर्याय शोधला पाहीजे. गावगुंडाच्‍या राजकारणापेक्षा विकासाचा मंत्र घेवून येणाऱ्यांना पाठबळ द्या असे आवाहन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.

संगमनेर तालुक्‍यातील खांबा येथे ना. विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत सुमारे २५ कोटी रुपयांच्‍या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्‍यात आला. खांबा ग्रामपंचायतीचे सरपंच रवींद्र दातीर यांच्‍यासह सर्व सदस्‍य आणि गावातील युवक कार्यकर्त्‍यांनी भाजपामध्‍ये प्रवेश केला. याप्रसंगी भाजपाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, संगमनेर तालुक्‍याला १४५ कोटी रुपयांचा निधी उपलब्‍ध करुन दिला आहे. महायुती सरकारमुळे मिळालेल्‍या निधीचे श्रेय कोणी घेत असले तरी जनता जागरुक आहेत. कारण वर्षानुवर्षे या भागाला रस्‍ते मिळाले नाहीत, पाण्‍याचा प्रश्‍न सुटला नाही. अनेक वर्षे मंत्रीपद मिळूनही रोजगारची कुठलीही साधनं तुम्‍हाला निर्माण करता आली नाहीत. मग तुमचा तालुका नेमका कशात पुढे आहे असा सवाल त्‍यांनी उपस्थित केला.

दुष्‍काळी भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाचे कामही महायुती सरकारमुळे मार्गी लागले असून, भोजापूर चारीचा प्रश्‍नही लवकरच मार्गी लागेल. पठार भागातील पाणी प्रश्‍नाबाबतही आपण गांभिर्याने सरकारच्‍या माध्‍यमातून प्रयत्‍न करु अशी ग्‍वाही देतानाच युवकांच्‍या रोजगारासाठी आता जिल्‍ह्यात तीन औद्योगिक वसाहती विकसीत होत आहेत. यापुर्वी असे निर्णय होवू शकले नव्‍हते. अनेक उद्योजक आता जिल्‍ह्यात येण्‍यास तयार झाले आहेत. जिल्ह्यातील युवकांना जिल्‍ह्यातच रोजगार उप‍लब्‍ध करुन देण्‍याचे उदिष्‍ठ आपण ठेवले असून, जिल्‍ह्यामध्‍ये संत गाडगे बाबा कौशल्‍य प्रशिक्षण प्रबोधि‍नी स्‍थापन करण्‍याचा निर्णय केला आहे. संगमनेर तालुक्‍यातही ही कौशल्‍य प्रबोधिनी स्‍थापन करण्‍यास आपण प्राधान्‍य देणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

पशुसंवर्धन विभागाच्‍या माध्‍यमातून धनगर समाजाकरीता मेंढी व शेळी सहकार विकास महासंघाची स्‍थापना करण्‍यात आली असून, या माध्‍यमातून रोजगार निर्मिती करण्‍याचा निर्णय राज्‍य सरकारने घेतला आहे. दूध उत्‍पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्‍यासाठी ५ रुपये अनुदानाची योजना सुरु केली मात्र अनेक दूध संघानी शेतकऱ्यांची माहीती उपलब्‍ध न करुन दिल्‍यामुळेच शेतकरी अनुदानापासून वंचित राहत आहेत. अनुदान मिळत नाही म्‍हणून सरकारच्‍या विरोधात ओरडणाऱ्यांनीच अनुदान मिळण्‍यापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवल्‍याचा आरोप विखे पाटील यांनी केला.

मंत्री विखे पाटील यांची भव्‍य मिरवणूक काढण्‍यात आली. रणखांब आणि परिसरातील गावांमध्‍ये भव्‍य स्‍वागत करण्‍यात आले. श्री क्षेत्र बाळेश्‍वर येथेही विकास कामांचा भूमीपुजन समारंभ संपन्‍न झाला. श्री क्षेत्र बाळेश्‍वर येथे पर्यटन विकास योजनेच्‍या माध्‍यमातून अधिक निधी उपलब्‍ध करुन देण्‍याचे त्‍यांनी सांगितले. याबाबत महसूल व वन विभागाच्‍या आधिकाऱ्यांना त्‍यांनी पर्यटन विकासाचा प्रकल्‍प आराखडा तयार करण्‍याच्‍या सुचना त्‍यांनी दिल्‍या.

खांबा येथील पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर यांचे स्‍मारक हे एक प्रेरणास्‍थान आहे. जिल्‍ह्याला त्‍यांचे नाव द्यावे ही अनेक वर्षांची मागणी महायुती सरकारने पुर्ण केल्‍याचे मंत्री विखे पाटील म्‍हणाले. खांबा येथील जोगींदरा तलाव, जवळटेक तलाव दुरुस्‍तीसाठी निधी देण्‍याचे आश्‍वासन देतानाच आता संपूर्ण गाव आणि ग्रामपंचायतच भाजपमय झाल्‍यामुळे या गावाच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्‍याचे आश्‍वासनही त्‍यांनी दिले.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !