उंबरी बाळापूर जिल्हापरिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
◻️ १ ली ते ४ थी च्या चिमुकल्यांनी सादर केलेल्या कलाविष्काराने उपस्थित भारावले
संगमनेर LIVE (आश्वी) | चिमुकल्यांच्या जडणघडणीच्या काळात त्याच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणाबरोबर प्रतिभाशक्तीला वाव मिळावा या हेतूने उंबरी बाळापूर (ता. संगमनेर) येथे जिल्हापरिषद प्राथमिक शाळेकडून वार्षिक स्नेहसंमेलनाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित स्नेहसंमेलन कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला.
शनिवारी संध्याकाळी स्नेहसंमेलनाची सुरवात दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन करुन झाली. यावेळी हिंदी गाणी, रामायणावर आधारित गीते यासारखे बहारदार कार्यक्रम नियोजनबद्ध व प्रभाविपणे सादर झाले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास यावर आधारित गीतानी उपस्थित नागरिकांमध्ये उत्साह संचारला होता. विनोदी पोते नृत्य आणि विनोदी नाटक यानी उपस्थिताना खळखळून हसवले. विशेष म्हणजे तब्बल २८ ते २९ सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी प्रभावीपणे सादर करण्यात आले.
यावेळी विविध स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्याचां शिक्षण विभागातील मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका विजया भुसाळ, शिक्षक रामराव देशमुख, शिक्षिका वैशाली पाबळ यांच्या सह शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, तंटामुक्ती समिती या सर्वाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व त्यांचे सर्व सहकारी तसेच गावचे सरपंच, उप सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, मदतनीस, माजी विद्यार्थी व गावातील तरुण मंडळांनी विशेष परिश्रम घेतले.
दरम्यान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक डोखे यांनी केले तर हौशिराम मेचकर, सुनील दिघे यांनी त्यांना सहकार्य केले. आभार शिक्षक रामराव देशमुख यांनी मानले. इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळा पेक्षा उत्तम स्नेहसंमेलनाचे आयोजन आणि १ ली ते ४ थी च्या चिमुकल्यांनी सादर केलेल्या कलाविष्काराने उपस्थित भारावल्याचे चित्र पहावयास मिळाले असून स्नेह भोजनाने या कार्यक्रमाची सांगता झाली.