ना. रामदास आठवले यांच्या गाडीला अपघात ; आठवले सुखरूप
अपघातात वाहनाचे मोठे नुकसान ; संपूर्ण कुटुंब होते सोबत
संगमनेर LIVE (मुंबई) | रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले आज गुरुवार दि. २१ मार्च रोजी सायंकाळी ६.१५ वाजता वाई (सातारा) येथुन मुंबई ला येत असताना त्यांच्या वाहनाला वाई येथे अपघात झाला. अपघातात गाडीतील कोणीही जखमी नाही. ना. रामदास आठवले सुखरूप बचावले आहेत.
ना. आठवले वाई येथून मुंबईकडे येत असताना समोर अचानक कंटेनर पंक्चर झाल्यामुळे थांबले होते. त्यामुळे अचानक पुढील पोलीस गाडी ने ब्रेक मारल्यामुळे त्या गाडीवर रामदास आठवले यांची गाडी धडकली. त्यात गाडीचे नुकसान झाले असून ना. रामदास आठवले सुखरूप आहेत. त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी सौ. सिमाताई आठवले, सासु नंदा काशीकर आणि सीमाताई आठवले यांच्या मामी असे सर्व जण सुखरूप आहेत. अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. दुसऱ्या वाहनाने ना. रामदास आठवले मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती रिपाइंचे सातारा जिल्हा अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी दिली आहे.
दरम्यान अपघाताचे वृत्त कळल्यानंतर देशभरातून आठवलेंच्या चाहत्यांचे कार्यकर्त्याचे फोन येत आहेत. याबाबत कोणीही काळजी करू नये संघर्षनायक ना. रामदास आठवले हे सुखरूप असल्याचे त्यांच्या पत्नी सौ. सीमाताई आठवले यांनी कळविले आहे.