पिंप्री लौकी अजमपूर येथे विचित्र आजाराने ४ दुधाळ गायीसह एका कालवडीचा मृत्यू
◻️ शेतकरी वर्गात मोठी खळबळ ; अर्थिक नुकसानामुळे शेतकरी धास्तावले
संगमनेर LIVE (आश्वी) | पिंप्री लौकी अजमपुर (ता. संगमनेर) गावातील दुध उत्पादक शेतकरी संदीप भाऊसाहेब गिते यांच्या ४ दुधाळ गाया व नामदेव भिकाजी आव्हाड यांची १ गाय अशा एकूण ५ गायीचा गुरुवार दि. २८ रोजी दुपारी ११ वाजता विचित्र आजाराने मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच सरपंच सौ. संगिता गिते आणि उप सरपंच बाजीराव गिते यांनी घटनास्थळी भेट दिली. तातडीने त्यांनी पशुवैदकिय अधिकारी शिवाजी फड यांच्याशी संपर्क करून घटनेची माहिती दिली. पशुवैदकिय अधिकारी यांनी घटनास्थळी दाखल होत उत्तरणीय तपासणीसाठी अहवाल पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवला आहे.
ऐन उन्हाळ्यामध्ये पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलेल्या गायीचा अचानक मृत्यू झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या गायीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याबाबत अधिकृत उलगडा झाला नसला तरी ह्रदय विकाराच्या झटक्याने या गायींचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकारी यांनी वर्तविला आहे.
दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे शेतकऱ्यांचे ५ लाख रुपये नुकसान झाले आहे. दुधाला भाव नाही, चारा आणि पाण्याचा प्रश्न उभा ठाकला असताना पशुखाद्याचे भाव गगणाला भिडले आहेत. त्यामुळे दुध धंदा मोडकळीस आला आहे. अशात लाळ्या खर्कूत या आजाराने परिसरात धूमाकूळ घातला आहे. त्यात आता विचित्र आजाराने ५ गायीचा मृत्यू झाल्याने दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
पाच गायीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याबाबत सविस्तर पाहणी करुन एका मृत गायीचे नमुने तपासणीसाठी औंध (पुणे) प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. अहवाल आल्यानंतर गायीच्या मृत्यूचे खरे कारण समोर येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाची काळजी आणि खबरदारी घ्यावी, असे आवाहन पशुधन पर्यवेक्षक शिवाजी फड यांनी केले आहे.