प्रत्येकाला अभिमान वाटावा असेचं जिल्ह्याचे ‘अहिल्यानगर’ नामकरण !
◽ नामांतराचा निर्णय अहमदनगर जिल्ह्यातील तमाम जनतेसाठी प्रेरणादायी आणि अभिमानास्पद
आपल्या अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर होऊन ‘अहिल्यानगर’ करण्यात आले आहे. हा नामांतराचा निर्णय अहमदनगर जिल्ह्यातील तमाम जनतेसाठी प्रेरणादायी व अभिमानास्पद आहे. नामांतरासाठी ज्या शासकीय अधिकारी व राजकीय नेते मंडळींनी मेहनत घेतली व निर्णय प्रक्रिया पूर्ण केली ते सर्वच अभिनंदनास पात्र आहेत.
महापुरुष अथवा संत जन समस्त मानव जातीच्या उद्धारासाठीच जन्म घेत असतात. महापुरुषांना जाती धर्माच्या कैदेत बंदिस्त करू नये व त्यादृष्टीने पाहूही नये. कदाचित त्यांच्या जन्माने संबंधित जातीला गौरव प्राप्त होत असेल एवढेच. अहमदनगर जिल्ह्यासह देशातील सर्व लोकांना अभिमान वाटावे असेच पवित्र कार्य अहमदनगर जिल्ह्याच्या भूमिकन्या म्हणजेच ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांनी करुन ठेवले आहे.
प्रथमता अंधश्रद्धेचा भाग बाजूला ठेवून अहिल्यादेवी यांचे अवतारण किंवा प्रकटीकरण दैवी वंशांतले आहे हे समजावून घ्यावे लागेल. कलीयुगामध्ये केवळ आणि केवळ ‘पुण्यश्लोक’ हि अतिउच्च व पवित्र पदवी फक्त अहिल्यादेवी होळकरांनाच सर्व समाजाने प्रदान केलेली आहे. यावरूनच त्यांचे अलौकिकत्व सिद्ध होते. इतिहासाचे अवलोकन करता त्यांच्या सर्वस्पर्शी व अतुलनीय कार्यामुळेच जनतेने त्यांना त्यांच्या हयातीतच अहिल्याबाईचे ‘अहिल्यादेवी’ केले. त्यांच्या पवित्र कार्याचा प्रभाव आजही उत्तर भारतीयांमध्ये अहिल्यादेवीना ‘देवीजी’ म्हणूनच संबोधतात.
इतिहासाचे विश्लेषण केल्यास बहुतांशी राजांनी आपापल्या कार्यक्षेत्रापुरतेच जनहिताचे काम केलेले दिसते. देवींचे कार्य हिमालयाच्या केदारनाथपासून दक्षिणेच्या रामेश्वरपर्यंत आणि पूर्वेच्या जगन्नाथपुरी पासून पश्चिमेच्या द्वारकेपर्यंत होते. यातूनच त्यांची विशालता व कर्तुत्वसंपन्नता सिद्ध होते. अहिल्यादेवींचे सासरे सुभेदार मल्हारराव होळकर व स्वतः अहिल्यादेवी यांनी स्वकर्तृत्वाने इंदोर हे संस्थान भारत भरामध्ये आर्थिक व सामाजिक दृष्ट्या अतिशय संपन्न केलेले होते. त्यांच्या आर्थिक संपन्नतेचे उदाहरण म्हणजे त्यांनी दस्तुरखुद पेशवे यांना त्या काळात ६३ लाख रुपये कर्जाऊ दिलेले होते. (आजच्या हिशोबाने अब्जावधी रुपये)
१७ व्या शतकातील मराठेशाहीच्या त्या आधारस्तंभ होत्या. अहिल्यादेवींनी अत्यंत उदार भावनेने व मुसुद्देगिरीने पानिपतच्या युद्धामध्ये जेव्हा शिंदेशाही अत्यंत अडचणीत व त्यामुळे ते दिवाळखोरीत निघाले. अशावेळी त्यांनी पुढाकार घेऊन महादजी शिंदे यांना रुपये ३३ लाखांची आर्थिक मदत देऊन, हिम्मत देऊन शिंदेशाही टिकून धरण्याचे अत्यंत मोलाचे व भरीव कार्य केले.
अहिल्यादेवींच्या आर्थिक संपन्नतेचे, नियोजनाचे व नीतीमत्तेचे उत्तम उदाहरण म्हणजे स्वतःच्या राज्यातून कर रूपाने येणाऱ्या महसुलाचा १०० टक्के उपयोग फक्त त्यांच्या राज्यातील जनतेसाठीच केला. मात्र त्यांच्या खाजगीच्या (त्या काळातील प्रचलित राज धोरणानुसार) रक्कमेतूनच त्यांनी सर्व देशभर समाज उपयोगी व अध्यात्मिक कार्य केलेले आहे.
यामध्ये नदीवरील घाटाची बांधणी असेल, बारा ज्योतिर्लिंगाचे पुन:र्जीवन असेल, देशातील विविध रस्त्यांच्या कडेला पिण्याच्या पाण्याच्या बारवा असतील, देशभरात अनेक मंदिरांची निर्मिती असेल, अनेक धर्मशाळांची बांधणी असेल आणि सर्व देशभर अध्यात्मिक ठिकाणी अन्नछत्रांचे कार्य असेल, पाण्याचे तलाव असतील या सर्व समाजाभिमुख कार्यासाठी त्यांनी स्वतःच्या खाजगीतील रक्कम वापरलेली आहे.
यावरून नीतिमत्तेवर आधारित आर्थिक धोरणांची स्पष्ट जाणीव होते. आपल्या राज्यातील पशु पक्षांना हक्काचे अन्न व पाणी मिळण्यासाठी त्यांनी स्वतंत्र गायरानाची निर्मिती करून गायरान सामूहिकरीत्या गावकऱ्यांनी नांगरून पेरणी करावी. त्यामधील येणारे धान्य पक्षांना खाऊ द्यावे व उरलेला चारा गावच्या गुरांना उपलब्ध करून द्यावा असा अत्यंत भावनिक व संपूर्ण जीवाविषयी दया असलेला निर्णय घेणाऱ्या एकमेव राज्यकर्त्या म्हणून उठून दिसतात.
आज देशांमध्ये भिल्ल समाजाला ‘नाईक’ म्हणून संबोधले जाते. नाईक ही पदवी आहे. आजही लष्करामध्ये ती प्रचलित आहे. पूर्वी आदिवासी समाजाला हक्काचे उत्पन्न स्रोत नव्हते. त्यामुळे उपजीविकेसाठी संबंधित समाजाला पर्यायाने चोरी, दरोडे असे कृत्य करावे लागत व त्यामुळे जनता हैराण होत असे. जनतेच्या संरक्षणासाठी त्यांनी प्रथम त्यांचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी आपली एकुलती एक मुलगी पणाला लावली. तरीही पेंढाऱ्यांचा उपद्रव थांबला नाही.
त्यांच्या या वागण्याबाबत अहिल्यादेवीना चिंतन व अभ्यासांती असे लक्षात आले की, या लोकांना हक्काचे उत्पन्न नाही त्यामुळे हे लोक असे करतात. ते ध्यानात आल्यामुळे त्यांनी दरबार बोलावून सर्व जकात वसुली नाक्याचे प्रमुखपद पेंढारे (भिल्ल) समाजाच्या नेत्यांच्या स्वाधीन केले. सर्व कारभारी मंडळी चिंतेत पडली. त्यांनी या निर्णयाला विरोध करण्याचा प्रयत्न केला की, चोरांच्या हातात मालमत्तेच्या चाव्या दिल्यासारखे होईल असे नमूद केले. यावर देवींनी निर्णय दिला की, आपण वर्षभर या निर्णयाची अंमलबजावणी करू आणि जर महसूल कमी झाला की निर्णय घेऊ.
वर्षानंतर असे निदर्शनास आले की महसुलात दुप्पट वाढ झाली. यावरून आदिवासी समाजाचा प्रामाणिकपणा निदर्शनास आला व त्यानंतर देवींनी दरबारात सर्व आदिवासी समाजाला ‘नाईक’ ही पदवी बहाल करून आदिवासी समाज मुख्य प्रवाहात घेऊन त्यांची जबाबदारीच्या जागेवर नेमणूक केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी सर्व आदिवासी समाजाला शासनाच्या मालकीच्या जमिनी बहाल केल्या. यावरून देशांमध्ये आदिवासी विकासाच्या कार्यक्रमाची मूलभूत व पायाभूत संकल्पना देवीजींनी अमलात आणली. यातच त्यांच्या सर्व समाजाविषयी संवेदनाशील भावनेचे दर्शन घडते.
अहिल्यादेवींनी त्यांच्या कालखंडामध्ये म्हणजे (सुमारे २५० ते ३०० वर्षापूर्वी) ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या अंतर्गत राज्यांमध्ये ठिकठिकाणी तळ्यांची व जलाशयाची निर्मिती केली. शेतकऱ्यांना उत्तम बियाणे उपलब्ध व्हावे म्हणून ‘बियाणाची बँक’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविली. इत्यादी व अन्य उपक्रमातून शेतकऱ्यांचे जीवन सुखमय व आनंदमय केले.
कृषी धोरणाचे बीजारोपण त्यांच्या कालखंडातच झाल्याचे दिसते. ज्या समाजातील वर्गाकडे स्वतःच्या जमिनी नव्हत्या अशा भूमीहीन समाजासाठी अहिल्यादेवींनी त्या काळात ‘लघुउद्योगाची’ निर्मिती केली. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे देशभरातून सर्व विणकर कारागीर एकत्र करून आपल्या माहेश्वरी नगरीमध्ये वस्त्र उद्योगाची निर्मिती केली. त्यातूनच आज ‘माहेश्वरी’ साडी जगप्रसिद्ध आहे.
एक दिवस काही ब्राम्हण स्त्रिया देवीजींना राजवाड्यामध्ये भेटायला गेल्या. त्यांची व्यथा ऐकली की, आमच्या उपवर मुली झालेल्या आहेत. त्यांचे लग्न जमत नाही कारण वर पक्ष अवाजवी हुंडा मागत आहे. या समस्येवर देवीजींनी दुसऱ्या दिवशी दरबार बोलावून हुंडा देणारा, हुंडा घेणारा व लग्न जमविणारा मध्यस्थी या तिघांनाही दंडात्मक कार्यवाहीचा कायदा अस्तित्वात आणला. हुंडाबंदी कायद्याच्या त्या जनक आहेत.
त्यांच्या देशभरातील रस्त्याच्या कडेला अस्तित्वात असलेल्या बारवांचे स्थापत्य शास्त्रानुसार अभ्यास केल्यास असे निदर्शनात येते की, या सर्व बारवा जिथे हक्काचे पाणी आहे. तिथेच निर्माण केलेल्या आहे. यावरून भूगर्भातील पाण्याचे शोध ओळखणारे अचूक तंत्रज्ञान त्यांच्याकडे त्या कालखंडात उपलब्ध होते हे स्पष्ट होते.
आजही त्यांच्या बारवा उथळ असूनही पाणीसाठा योग्य आहे. तसेच या बारवांचे बांधकाम चौकोनी असून त्यांच्या पायऱ्या वाजवीपेक्षा खूप रुंद आहे. तोंडाची रुंदी जास्त आहे. याचे कारण नुसतेच मनुष्याला पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे असे नसून कोणतेही जनावर / प्राणी सहजासहजी पायऱ्या उतरून पाणी पिऊ शकेल. असे शास्त्रीय स्थापत्य नियोजन देवीजींनी केलेले दिसते. यातून त्यांचे सकल जीवमात्रा विषयीचे प्रेम, जिव्हाळा, काळजी त्याचबरोबर शास्त्रीय दृष्टिकोनाचा अभ्यास स्पष्टपणे निदर्शनास येतो. आजच्या काळातही या गोष्टी अनुकरणीय आहे.
अहिल्यादेवींचे स्त्रियांविषयीचा आधुनिक विचार, दृष्टिकोन, सबलीकरण याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी त्यांच्या काळातच स्वतः संपूर्ण लष्करी शिक्षण घेऊन आपल्याबरोबरच इतर स्त्रियांना देखील लष्करी शिक्षण दिलेले होते. त्यातूनच त्यांनी स्त्रियांची स्वतंत्र फौज निर्माण केली होती. आज आपण अलीकडे अलीकडे महिलांना लष्करात प्रवेश द्यायला सुरुवात केली आहे.
त्यांच्या या स्त्री लष्करी शिक्षणाबाबतचे उदाहरण आपल्याला इतिहासात रघुनाथ पेशवे यांच्या लढाईच्या प्रसंगातून निदर्शनास येईल. रघुनाथ पेशवे पैशाच्या लोभापोटी देवीवर आक्रमण करण्यासाठी आले असता आपल्या महिला सैनिकासह त्या रणांगणात उभ्या ठाकल्या आणि आपल्या धारदार वाक्याने रघुनाथ दादांना लढाईपूर्वीच पराभूत केले. वाक्य असे आहे ‘दादा, या लढाईत तुम्ही जिंकलात तर पुरुष म्हणून फार पुरुषार्थ गाजविला असे होणार नाही, पण आम्हा स्रियांकडून तुम्ही हरल्यास तुमची नाचक्की उभ्या देशात पसरेल.’
अहिल्यादेवींची वर उल्लेख केल्याप्रमाणे संपूर्ण देशात संपत्तीक स्थिती एक नंबर होती यावर दस्तूरखुद्द पेशव्यांची बद नजर होती. ते गिळंकृत करण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न पेशव्यांकडून वेळोवेळी करण्यात आले. अतिरेक झाल्यानंतर अहिल्यादेवींनी पेशव्यांना देखील आपल्या करारीपणाची खालील वाक्यातून जरब दाखवली. ‘याद राखा’ आपला बदहेतू आमच्या ध्यानात आहे. इथे आम्ही बांगड्या लेऊन बसलेले नसून, आम्हीही सुभेदारांची सून आहे हे समजून व्यवहार करावा.’’ असा इशारा त्यांनी दिला होता.
समाजातील सर्व घटकाना योग्य तो न्याय देण्याचे, संधी देण्याचे हरतऱ्हेचे प्रयत्न अहिल्यादेवींच्या कार्यातून आपणाला दिसून येतात. यामध्ये उत्तम वैद्य, ज्योतिषी व्याकरणव्यत्ता, कीर्तनकार, मूर्तिकार, कवी, लेखक यासारख्या समाजातील अनेक विचारवंतांना योग्य संधी देऊन प्रोत्साहीत केल्याचे स्पष्ट दिसते.
याचे उत्तम उदाहरण म्हणजे संगमनेरचे प्रसिद्ध कवी ‘अनंत फंदी’ यांना इंदोर येथे सन्मानाची वागणूक देऊन, काही द्रव्य देऊन, प्रोत्साहित करून लावण्या व पोवाडे लिहिण्याच्या ऐवजी भजन व किर्तन लिहावे असा मोलाचा सल्ला देऊन विदा केले. मात्र इंदोर वरून पुण्याला त्या स्वतः जात असताना संगमनेर येथील प्रवरेचा पूल ओलांडताना त्यांच्या कानावर अनंत फंदीच्या लावणीचा आवाज आला. त्यांनी आपली अंबारी संगमनेर येथील नदीतील संगम स्थानावर वास्तव्य करीत असलेल्या ‘अनंत फंदी’ कडे वळवली. अहिल्यादेवींना पाहताच अनंत फंदीनी लावणी सोडून भक्ती गीते गायला सुरुवात केली व देवींची माफी मागितली. कवी श्रेष्ठ मोरोपंत यांच्यासारख्या अनेक प्रतिभावंत कवींनी अहिल्यादेवींच्या पवित्र व निर्मळ जीवन प्रवाहावर आपल्या प्रतिभेने शब्दबद्ध केले यातच त्यांचे श्रेष्ठत्व सामावलेले आहे.
अहिल्यादेवींनी बारा ज्योतिर्लिंगाबरोबरच लोकांचे श्रद्धास्थान असलेली तीर्थक्षेत्रे उदाहरणार्थ जेजुरी, पंढरपूर, काशी, अयोध्या, अमरकंटक, उज्जैन, केदारनाथ, कोल्हापूर, आंबेगाव, गंगोत्री, गया, चित्रकुट, चौंडी, जगन्नाथपुरी, जांबघाट, जावगाव, त्रंबकेश्वर, द्वारका, नाशिक, निफाड, परळी, नेपाळ, पुष्कर, पैठण, पुणतांबा, प्रयाग, बीड, भीमाशंकर, भुसावळ, रामेश्वर, रावेर, वृंदावन, वेरूळ, श्रीशैल, संगमनेर, सातारा, सोमनाथ, हरिद्वार, ऋषिकेश या सर्व तीर्थक्षेत्रांचा विकास केला याची सत्यता तेथे आजही आपापल्या पाहावयास मिळते.
अहिल्यादेवीं जेवढ्या धार्मिक वृत्तीच्या होत्या तेवढ्याच लढाऊ वृत्तीच्या होत्या. अहिल्यादेवीनी स्वतः लढाईचे नेतृत्व करून चंद्रावत व सौभागसिंह यासारख्या बलाढ्य राजाचा लढाईमध्ये पराभव करून वध केला. अहिल्यादेवींनी प्रशासन अध्यात्म व व्यक्तिगत जीवन हे पूर्णपणे स्वतंत्र ठेवून प्रत्येक क्षेत्राला यथायोग्य न्याय दिलेला दिसतो.
सर्वात अत्यंत महत्त्वाचे व समाजाला बोध व प्रेरणा मिळणारे त्यांचे जीवन म्हणजे एका बाजूला व्यक्तिगत जीवनात पदोपदी प्रचंड दुःखाचे प्रसंग कि ज्यात तरुण वयात पतीचा अकाली मृत्यू, जावयाचा मृत्यू, त्याचबरोबर मुलीचे सती जाणे, आठ सवतीचे सती जाणे, नाथोबासारख्या एकुलत्या एक नातवाचा आजारपणा मध्ये बालपणातच मृत्यू, चार-पाच सुनांचे सती जाणे, वृद्धापकाळात सासऱ्याचा मृत्यू, असे एका पाठोपाठ डोळ्यादेखत एकूण १८ कुटुंबियांच्या मृत्यूच्या वेदना पचवत, सहन करत तितक्याच धारिष्टपणे, निष्ठेने, धैर्याने दुसऱ्या बाजूला लोकोत्तर कर्तव्य बजाविणारी शिरोदत्त व्यक्तिमत्त्वाचे दर्शन पदोपदी घडते. (एवढे प्रचंड दुःखदायक प्रसंग आजही आपल्याला कोठे पहावयास मिळणार नाही) निर्वश झाला तरी धीर खचू न देता सामाजिक कार्य, धार्मिक कार्य, राजनिष्ठा, राजकार्य उत्तमोत्तम करण्याचे धाडस या व्यक्तिमत्त्वाने पूर्णत्वास नेले.
अहिल्यादेवींची जनतेशी बंधीलीकी अंतकरणाच्या गाभ्यातून होती. थोडक्यात रामराज्यांच्या संकल्पनेपेक्षाही एक पाऊल पुढे जाऊन आपले कार्य नुसतेच आपल्या राज्यातील मनुष्य जीवन सुखी, आनंदी इतकेच मर्यादित न ठेवता आपल्या राज्यातील पशुपक्षी इत्यादी जीवात्म्याची काळजी घेणारे राज्य व कालखंड म्हणजेच ‘अहिल्या राज’. सातत्याने ३८ वर्ष ‘ समर्थ शासनकर्त्या’ म्हणून राज्यकारभार सांभाळणाऱ्या अद्वितीय व्यक्तिमत्व. शेवटी विनया खडपेकर या लेखिकेच्या शब्दात ‘अहिल्यादेवींचे यथार्थ व्यक्तिमत्वाचे वर्णन’ आपल्या अवलोकनासाठी..
‘ती सत्ताधारी होती, पण ती सिंहासनावर नव्हती.’
ती राजकारणी होती, पण ती सत्तेच्या चळवळीत नव्हती.
ती पेशव्यांशी एकनिष्ठ होती, पण ती त्यांच्यापुढे नतमस्तक नव्हती.
ती व्रतस्थ होती, पण संन्यासीनी नव्हती.
जेंव्हा लढाई हे जीवन होते आणि लूट हा जनतेचा धर्म होता, हुकूमत हा सत्तेचा स्वभाव होता, तेंव्हा तिच्या कल्याणी प्रतिभेचे किरण नदीवरच्या घाटावरून उमटले. तिच्या जीवनदायी प्रेरणेने तळे, अन्नछत्रे, धर्म शाळेचे रूप घेतले. तिच्या अनाक्रमक धर्मशीलतेचे मंगल प्रतिध्वनी भरत खंडाच्या मंदिरामधून घुमले. ती सर्व गुण संपन्न देवता होती, तरीही तिला माणूसपणाच्या सगळ्या मर्यादा होत्या. अशा स्थितीत अठराव्या शतकातल्या मराठ्यांच्या इतिहासाच्या पटावर ती शुक्राच्या चांदणीसारखी लुकलुकली.
तुर्तास एवढेचं., फोन करुन आपली प्रतिक्रिया नक्की कळवा.
लेखक
शाळीग्राम ठकाजी होडगर
9960577260
मांचीहिल, आश्वी बुद्रुक, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर