२७ मे पंडित जवाहरलाल नेहरूं यांचा आज स्मृतिदिन!
◻️ पंडित नेहरू आणि संगमनेर एक आठवण.. जेष्ठ साहित्यिक डॉ. संतोष खेडलेकर यांचा लेख
◻️ जेव्हा दस्तुरखुद्द पंडीत नेहरू गाडीतून उतरुन ‘हुर्र हुर्र हुर्र’ करत बकऱ्या हुसकवतात तेव्हा?
१५ फेब्रुवारी १९३७... तो दिवस काही वेगळाच होता, संगमनेरच्या मोटार अड्ड्यावर सकाळपासून कामाची धांदल सुरू होती. दिवस पुढे सरकत होता तशी लोकांची गर्दी वाढत होती. याला कारणही तसेच होते, देशात बहुचर्चित असलेले काँग्रेसचे नेते पंडित जवाहरलाल नेहरू हे सभेसाठी येणार होते.
१९३७ मध्ये ब्रिटिश सरकारने मुंबई इलाख्यात असेंब्लीच्या निवडणूका घेण्याचे जाहीर केले होते. आताच्या उत्तर नगर जिल्ह्यातून चार जागा निवडून द्यायच्या होत्या. संगमनेरचे प्रसिद्ध वकील केशवराव देशमुख उर्फ के. बी. दादा हे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार होते.
के. बी. दादा हे त्याकाळातील प्रख्यात वकील. बडोदा येथून प्रसिद्ध होणाऱ्या जागृती या नियतकालिकांचे संपादक पाळेकर यांची कन्या जयदेवीबाई या दादांच्या धर्मपत्नी. (पुढे जाऊन राज्याच्या मंत्रीमंडळात विविध खात्यांचे मंत्रिपद भूषविणारे बी. जे. खताळ पाटील हे दादांचे जावई) के. बी. दादांखेरीज त्यांच्याखेरीज ल. मा. पाटील, काकासाहेब चिंचोरकर व रामभाऊ गिरमे हे देखील काँग्रेसचे उमेदवार होते.
दक्षिण नगर भागात सरदार पटेल यांचा प्रचार दौरा झाला होता. अशातच बातमी आली की पंडित नेहरू हे १५ फेब्रुवारीला नगर जिल्ह्यात तीन प्रचार सभा घेणार. त्यानुसार पंडितजींची सकाळी नगरला, दुपारी बेलापूरला प्रचारसभा झाली. या प्रचारसभेत पंडितजींना घेण्यासाठी के. बी. दादा बेलापूरला गेले होते.
बेलापूरची सभा आटोपून पंडितजी व दादा सोबत संगमनेरला आले. भर दुपारची वेळ होती थंडी संपली होती आणि फेब्रुवारीच्या मध्यावरचे ऊन तापायला लागले होते. भर उन्हात लोकांनी मोटार अड्ड्यावर सभेसाठी गर्दी केली होती. संगमनेरातुन लढल्या जात असलेल्या स्वातंत्र्यसंग्रामात मोलाचे योगदान देत असलेले रामकृष्णदास महाराज (त्यांच्या नावाने संगमनेर नगरपालिकेचे सध्याचा ‘रामकृष्ण हॉल’ आहे), बापूसाहेब पारेगावकर, रामभाऊ देशपांडे, बंडूसिंह वस्ताद आदी मंडळी जातीने सभेची सर्व व्यवस्था बघत होती.
मोटार अड्ड्यासमोरील पमा गुरूंच्या वाड्याच्या ओट्यालगत (सध्या इथे नरेंद्र क्लॉथ स्टोअर्स हे कपड्याचे भव्य दुकान आहे) सभेसाठी व्यासपीठ तयार करण्यात आले होते. पंडितजींचे आगमन झाले. त्यांच्या जयजयकाराच्या घोषणांनी मैदान दुमदुमून गेले. पंडितजी भाषणात उभे राहिले, लोक कानात प्राण आणून त्यांचा एकेक शब्द ऐकत होते.
‘काँग्रेसवरील प्रेमाने आणि स्वातंत्र्याच्या आशेने आजवर आपण ब्रिटिश सत्तेशी सामना केला. अनेक अत्याचार, जुलूम सहन केले आणि देशाबद्दल प्रेम व्यक्त केले. या निवडणुकीत आपण काँग्रेसला मत देऊन काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना विजयी करा. आपण छत्रपतींचे शिलेदार आहात, आपल्या पूर्वजांनी ज्या मर्दुमकीने परकीय सत्तेविरुद्ध लढून शिवरायांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र स्वतंत्र केला. स्वराज्य स्थापन केलं. त्याप्रमाणे आपल्या भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी या निवडणुकीत काँगेसला विजयी करा.'
या सभेची एक मजेशीर आठवण सभेला उपस्थित असलेले व पुढे शिक्षकी पेशात जाऊन निवृत्त झालेले शिक्षक सोमनाथ सुतार सांगतात. त्यांच्या म्हणण्यानुसार सभा संपली, पंडितजी मोटारीत बसून नाशिकला जायला निघाले. मैदानाच्या चारही बाजूने बाहेर जाणाऱ्या रस्त्यावर मोठी गर्दी होती. तेलीखुंट भागात काही बकऱ्या सभेतून परतणाऱ्या लोकांच्या गर्दीत घुसल्या आणि गोंधळून इकडे तिकडे पळू लागल्या.
बकऱ्या आडव्या आल्याने पंडितजींची गाडी थांबली, आजूबाजूचे लोक हुर्र हुर्र हुर्र करीत बकऱ्या हुसकायला लागले पण बकऱ्या गोंधळून पुन्हा गाडीला आडव्या येत होत्या. लोकांचा सामूहिक हुर्र हुर्र आवाज ऐकून पंडितजींना मोठी गम्मत वाटली, तेही पटकन गाडीतून उतरले आणि बकऱ्यांमागे इकडून तिकडे धावणाऱ्या लोकांमागे हुर्र हुर्र हुर्र करीत इकडून तिकडे जाऊ लागले. खुद्द पंडितजी बकऱ्या हुसकताहेत आणि हुर्र हुर्र करताहेत याचाही लोकांनी खूप आनंद घेतला. सभेनंतर या घटनेची मोठी चर्चा सुरू होती.
या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. के. बी. देशमुख संगमनेरचे पाहिले आमदार झाले. पंडितजींची सभा झाली त्या ऐतिहासिक जागेला ’नेहरू चौक’ म्हणून ओळखले जाऊ लागले. आजही या जागेला नेहरू चौक म्हणून ओळखले जाते.
आज पंडितजींचा स्मृतीदिन... आधुनिक भारताच्या शिल्पकाराला विनम्र अभिवादन!
डॉ. संतोष खेडलेकर
(लेखक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य तसेच जेष्ठ पत्रकार आहेत.)